“राजसा जवळी जरा बसा” फेम लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे नि’धन, लावणीमधील मानाचे सुवर्णपान हरपले..
आपल्या या महाराष्ट्राला लावणीची खुप मोठी परंपरा लाभलेली आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये महान कलाकारांनी आपल्या लावण्या सादर केल्या आहेत. आपले अवघे आयुष्य लावणी कलेसाठी वेचलेल्या आणि बैठकीच्या लावणीमधील मानाचे सुवर्णपान ठरलेल्या ज्येष्ठ लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर यांचे वयाच्या 90 व्या वर्षी पुण्यात वृद्धापकाळाने नि’ध’न झाले आहे. 14 सप्टेंबर 2022 रोजी, दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घे’त’ला.
गुलाबबाई संगमनेरकर यांचा जन्म 1933 साली संगमनेर येथे झाला. त्यांच्या पश्चात लावणी कलावंत वर्षा संगमनेरकर यांच्यासह तीन मुली, जावई, नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या आई शिवडाबाई याही तमाशातील मोठ्या कलावंत होत्या. त्यांनी देखील अनेक वर्षे तमाशात काम केलेले आहे. आपल्या या कलेचा वारसा लेकीने पुढे न्यावा असे त्यांच्या आईला वाटत होते म्हणून त्यांनी गुलाबबाईंना लावणी शिकवायला सुरुवात केली.
लावणी क्षेत्रात कार्यरत असलेल्या त्यांच्या आईची स्वत:चीच संगीत पार्टी होती. त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना त्यांच्या आई राधाबाई बुधगावकर यांच्याकडून मिळाले. गुलाबबाईंनी राधाबाई बुधगावकर यांच्याकडून लावणीचे संपुर्ण शिक्षण घेतले. पुढे त्यांनी छबू नगरकर, सुगंधा सिन्नरकर यांच्याकडेही लावणीचे धडे गिरविले. या दोन्ही ठिकाणी काही गोष्टी शिकल्यानंतर गुलाबबाई या बनुबाई शिर्डीकर यांच्या पार्टीत सामील झाल्या. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांकडून लावण्यांची गायकी आणि अदाकारीचा अभ्यास केला.
लहान वयातच गुलाबबाईंनी फडाच्या तमाशातही काम केले. खानदेशमधील आनंदराव महाजन, तमाशासम्राट तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर अशा दिग्गज कलाकारांच्या पार्टीमध्ये काम केल्यानंतर गुलाबबाईंनी स्वत:ची संगीतबारी सुरू करण्यासाठी कलानगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरची निवड केली.
महाराष्ट्रात नावलौकिक झाल्यानंतर मुंबई दौर्यादरम्यान गुलाबबाईंना एच.एम.व्ही. या नामांकित कंपनीने निमंत्रित केले होते. या कंपनीने केलेल्या ध्वनिमुद्रणाला चांगला प्रतिसाद मिळाला. रेडिओद्वारे या लावण्या सर्वत्र प्रसारित होऊ लागल्या. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्रातून गुलाबबाईंना दिल्लीत कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली.
त्यांची बहीण मीरा हिच्यासोबत ‘गुलाब-मीरा संगमनेरकर’ या नावाने आर्यभूषण थिएटरमध्ये त्यांनी स्वतंत्र पार्टी सुरू केली. गुलाबबाई यांचे गायन आणि मीरा यांचे नृत्य हे पार्टीचे वैशिष्ट्य होते. पुढे लता मंगेशकर यांच्या ‘आजोळच्या गाणी’ या ध्वनिचित्रफितीत एक लावणीवर गुलाबबाई संगमनेरकर यांनी अदाकारी केली. ती लावणी म्हणजे ‘राजसा जवळी जरा बसा’ ह्या लावणीने सगळ्यांना वेड लावून टाकले.
आजही ही लावणी तेवढीच लोकप्रिय आहे. तसेच हिंदी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे. लावणीमधील विविध मान-सन्मानाच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत. गुलाबबाईंनी तारुण्यात पूर्ण महाराष्ट्र गाजवला. त्यांची खरी कारकीर्द घडली ती म्हणजे खानदेशातच. एकेकाळी गुलाबबाईंना खानदेशची लावणीसम्राज्ञी म्हटले जायचे.
जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षं गुलाबबाईंकडे खानदेशच्या लावणीकलेची सत्ता होती. बैठकीची लावणी गुलाबबाईंच्या डाव्या भुवईचा खेळ होता. लावणी करत स्वतः लावणी म्हणून तिच्यावर अदा करणे हे बैठकीच्या लावणीचे कसब होते त्यात गुलाबबाई अगदी माहीर होत्या. गुलाबबाई या विचारी कलावंत होत्या, बैठकीच्या लावणी म्हणजे त्यांचे एक स्वतःचे सौंदर्यशास्त्र आहे. त्यामुळेच बैठकीची लावणी सादर करताना आजवर, कधी त्यांचा दमसास गेला नाही, ना कधी अदेवरचा त्यांचा तोल!
गुलाबबाईंना दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर’ हा जीवनगौरव पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले होते. त्यांच्यात सर्व कला ठासून भरल्या होत्या. त्यांची गायक, त्यांचे नृत्य,अदा हे कोणा कलाकारात सहज मिळत नाही, पण त्या अपवाद होत्या असे म्हणता येईल.
अशा सर्वगुणसंपन्न असलेल्या नामवंत कलाकार गुलाबबाई संगमनेरकर यांनी आपल्यातून नि’रो’प घेतला. गुलाबबाईंच्या आकस्मित नि’ध’ना’मुळे लोककलेच्या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी मागे ठेवलेला त्यांच्या लावणीचा अमूल्य ठेवा पुढच्या अनेक पिढ्यांना योग्य मार्ग दाखवून देईल ह्यात तीळमात्र शंका नाही.