पहिल्या दोन प्रयत्नांत मिळाले अपयश, 6 महिने स्वतःला खोलीत कोंडून केला अभ्यास, आज आहे IAS अधिकारी
UPSC परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी लाखो उमेदवार दरवर्षी प्रयत्न करत असतात, परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करत असतात. आज आपण अशाच एका महिला आयएएस अधिकाऱ्या बद्दल जाणून घेणार आहोत. निधी सिवाच या हरियाणा येथील गुरुग्राम मधील आहेत.
त्या लहानपापासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी इयत्ता 10वी मध्ये 95% आणि इयत्ता 12वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवले होते. पुढे त्यांनी दीनबंधू छोटू राम विद्यापीठ, हरियाणा येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर शिक्षण घेतले. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर निधी यांना हैदराबाद मध्ये महिंद्रा येथे डिझाईन अभियंता म्हणून नोकरी मिळाली होती.
त्यांचे देशासाठी काहीतरी करण्याचे स्वप्न होते. म्हणून त्यांनी 2017 मध्ये आपली चांगली नोकरी सोडली आणि UPSC परीक्षेची तयारी करण्यास सुरूवात केली. पर्यायी विषय म्हणून त्यांनी इतिहास निवडला तसेच पर्यायी माध्यम म्हणून इंग्रजीची निवड केली. निधी यांनी पर्यायी विषय म्हणून इतिहास निवडला कारण यासाठी त्यांना 9वी आणि 10वीच्या अभ्यासक्रमाचा खूप फायदा झाला, असे त्यांनी सांगितले.
UPSC परीक्षेत निधी यांना 2 वेळा अपयश आले. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी त्यांची आयएएस होण्याची जिद्द कायम ठेवली आणि कसून अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासाची तयारी करण्यासाठी निधी यांनी 6 महिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले आणि UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांनी अभ्यासाला संपुर्ण वेळ दिला.
त्यांनी यासाठी खूप मेहेनत घेतली. या मेहनतीचे फळ अखेर त्यांना 2018 मध्ये मिळाले. त्या तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि पुढे त्यांची आयएएस पदासाठी निवड करण्यात आली. आपल्याकडे जिद्द आणि चिकाटी असेल तर आपण आपले ध्येय निश्चितच साध्य करू शकतो हे निधी यांनी दाखवून दिले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांसाठी त्या एक प्रेरणा ठरलेल्या आहेत.