मुंबईच्या झोपडपट्टीत झाला जन्म, उदरनिर्वाहासाठी ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकली, आता अमेरिकेतून आली ही ऑफर.

28 वर्षीय सरिता माळीची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्या कठीण परिस्थितीतुन जात त्यांनी जे यश मिळवले आहे त्यामुळे सरिता यांचे खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर कौतुक होत आहे. मुंबईतील झोपडपट्टीत जन्मलेल्या सरिता यांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी एकेकाळी ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकण्याचे काम केले.

आपल्या अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी इतर मुलांची शिकवणी घेतली आणि आता त्या अमेरिकेला जाऊन त्यांच स्वप्न पूर्ण करणार आहेत. सरिता यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टद्वारे त्यांची कहाणी सांगितली आहे, त्यानंतर ही गोष्ट तुफान व्हायरल झाली आहे.

सरिता माळी यांचे कुटुंब मुंबईत राहते. त्यांचे वडील कामाच्या शोधात मुंबईत आले होते. येथे काम करून ते कसा तरी कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सरिता यांचाही जन्म मुंबईतील झोपडपट्टीत झाला.

वडिलांचा भार हलका करण्यासाठी त्या त्यांच्यासोबत ट्रॅफिक सिग्नलवर फुले विकायला जायच्या. झोपडपट्टीजवळच्या सरकारी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्या मोठ्या झाल्यावर त्यांनी लहान मुलांची शिकवणी घ्यायला सुरुवात केली.

सरिता यांच्या कुटुंबात 6 लोक होते. संपूर्ण कुटुंब 10 बाय 12 च्या खोलीत राहत होते. वडील रामसुरत माळी दिवसभर काम करायचे आणि सरिता मुलांना शिकवायच्या आणि सिग्नलवर फुले विकायच्या. या शिकवणीच्या पैशातून त्यांनी पदवीसाठी प्रवेश घेतला. कुटुंबात आई सरोज माळी यांच्याशिवाय दोन भाऊ आणि एक बहीण आहे.

सरिता या अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांची आवड त्यांना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात घेऊन गेली. हिंदीत पदवी घेतली, नंतर पीएचडी केली, पण आता त्यांच्या आयुष्यात एक सुंदर वळण आले आहे.

2014 मध्ये सरिता यांना दिल्लीच्या जवाहरलाल विद्यापीठात प्रवेश मिळाला, त्यानंतर त्यांचे जगच बदलून गेले. स्वत: सरिता सांगतात की, जेएनयूमध्ये आल्यानंतर त्यांचा देश आणि जगाबद्दलचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी सांगितले की, “जेएनयूचे उज्ज्वल शैक्षणिक जग, शिक्षक आणि प्रगतीशील विद्यार्थी राजकारणाने मला खर्‍या अर्थाने देश समजून घ्यायला शिकवले आणि समाजाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला.”

सरिता यांना अमेरिकेतील दोन विद्यापीठांनी फेलोशिप देऊ केली आहे. त्यांना कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून फेलोशिपची ऑफर देण्यात आली आहे, परंतु सरिता यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची निवड केली आहे.

सरिता यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर हा किस्सा लिहिला, ज्यानंतर त्यांची स्टोरी खूप व्हायरल होत आहे. लोक त्यांचे अभिनंदन करत आहेत, त्यांच्या समर्पणाचे, त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर सरिता यादेखील त्यांच्या यशाने खूप खूश आहेत. त्यांची गुणवत्ता आणि शैक्षणिक रेकॉर्डच्या आधारे त्यांना ही फेलोशिप देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page