शेतकरी कन्येची यशाला गवसणी! MPSC परिक्षा उत्तीर्ण होऊन शेतकऱ्याच्या मुलीने केले आईवडिलांचे स्वप्न पूर्ण..

साधनांची कमतरता असूनही अनेकजण हतबल न होता कठोर मेहनत घेत यशाला गवसणी घालत असतात. जेव्हा ध्येयाचे वेड मनात असते तेव्हा कितीही विपरीत परिस्थितीतही काहीजण मागे न हटता मोठ्या जिद्दीने परिस्थितीवर मात करीत ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात.

अशा परिस्थितीमध्ये जर कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असेल तर अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. खासकरून शेतकरी कुटुंब म्हणजे शिक्षणासोबतच शेतीमध्ये देखील मदत करणे क्रमप्राप्तच असते. अशाच एका शेतकरी कुटुंबातील तरुणीची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. जिने आपल्या शेतकरी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करून राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

हर्षाली निंबा पवार ही नाशिकमधील मालेगाव येथील सौंदाणे मध्ये राहते. हर्षालीची नुकतीच राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक या पदासाठी निवड झाली आहे. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले. त्यांनतर तिने जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षण घेतले आणि केबीएच कनिष्ठ महाविद्यालयात हर्षालीने आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

हर्षालीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली तर तिची आई वंदना आणि वडील निंबा पवार हे दोघेही शेतकरी आहेत. हर्षाली ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे ती शिक्षणाबरोबरीने सुट्टीच्या दिवशी आईला मदत करण्यासह शेतीतील कामेही करत होती.

परंतु, शेतकरी असूनही हर्षालीने उच्चशिक्षित व्हावे अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. हर्षालीने देखील आपल्या परिस्थितीची जाणिव ठेवत शिक्षण पूर्ण करत जळगाव येथील कृषी महाविद्यालयात बीएससी ऍग्री पदवी घेतली. त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून तयारीला सुरुवात केली.

हर्षालीने आपल्या आहे त्या परिस्थितीकडे पाहून हार न मानता त्यातून रस्ता काढत नियोजनपूर्वक परीक्षेची तयारी केली. यादरम्यान जागतिक संकट ओढवले आणि सगळ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळेस परिक्षा पुन्हा कधी होणार याबाबत अनिश्चितता होती. मात्र, अशा परिस्थितीमध्ये देखील हर्षालीने एक चांगली संधी समजून आपल्या तयारीला आणखी वेग दिला.

या काळात तिच्या आई-वडिलांनी तिला चांगली साथ दिली. यासोबतच मित्र-मैत्रिणींचे देखील मानसिक पाठबळ मिळाले. या जिद्दीच्या जोरावर तिने कठोर परिश्रम घेत अखेर राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये दुय्यम निरीक्षक या पदावर झेप घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page