स्वतः च्या बचतीच्या पैशातून सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना घडवला विमान प्रवास!

शिक्षक म्हटले की कडक शिस्त अशी प्रत्येकाची समजूत असते. पण काही शिक्षक असे असतात जे आपल्याला शालेय ज्ञानाबरोबरीने बाहेरच्या जीवनाचा आनंद देखील देत असतात. प्रत्येक शाळेची सहल जाते हे आपल्याला माहीत आहेच पण आज आपण ज्या शाळेची गोष्ट जाणून घेणार आहोत त्या शाळेतील मुख्याध्यापकाने स्वतःच्या बचतीच्या पैशांनी मुलांना सहल घडवली आहे.

आपण बोलत आहोत देवास जिल्ह्यातील बिजेपूर गावातील सरकारी शाळेबद्दल.. या शाळेतील मुलांचे आदर्श असलेले शाळेचे मुख्याध्यापक यांनी मुलांना आयुष्यभराचा खास अनुभव दिला आहे. या शाळेचे मुख्याध्यापक किशोर कणसे यांनी त्यांच्या स्वतःच्या बचतीच्या पैशांतून मुलांना दोन दिवसांच्या प्रेक्षणीय दौरा करण्यासाठी नवी दिल्लीला चक्क विमानाने घेऊन गेले होते.

किशोर कणसे यांनी शाळेतील इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी या वर्गातील विद्यार्थ्यांना हा अविस्मरणीय अनुभव दिला आहे. ज्याचा मुलांना मनसोक्त आनंद लुटला आहे. या अनुभवाविषयी सांगताना मुलं सांगतात की, “आम्ही आमच्या शाळेच्या मैदानातून विमानाकडे नेहमी पाहत असतो. तेव्हा ते आम्हाला खूप लहान वाटतं असते. परंतु, जेव्हा आम्ही ते प्रत्यक्षात पाहिले तेव्हा आम्ही खूप वेळ विमानाकडेच पाहत बसलो होतो. खरोखरच हा अनुभव आमच्या सर्वांसाठी खूप खास होता.”

किशोर कणसे सांगतात, मुलं जेव्हा विमानात चढत होते तेव्हा त्यांचा उत्साह काही वेगळाच होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून जणू आनंद ओसंडूनच वाहत होता. कारण ते रोज पाहत असलेल्या विमानात बसण्याचे त्यांचे स्वप्न आज पूर्ण होत होते जे इतक्यात पूर्ण होईल याची कोणालाही अपेक्षाच नव्हती. तसेच काही जणांनी तर ट्रेनमधूनही प्रवास केलेला नव्हता. त्यामुळे मुलांनी एवढ्या लवकर विमानात फिरण्याची कल्पना कधी स्वप्नातही केली नव्हती.

परंतु, मुलांना एकदा तरी विमान प्रवास घडवावा अशी माझी इच्छा होती असे किशोर कणसे सांगतात. रोज कागदी विमान बनवून उडवणाऱ्या मुलांना प्रत्यक्ष विमानात बसवण्याचा अनुभव द्यावा अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी आपल्या स्व बचतीतून 60,000 रुपये या दौऱ्यासाठी वापरले आणि मुलांना कधी न विसरणारा क्षण अनुभवयाला दिला.

किशोर कणसे सांगतात की, मुलांना विमान प्रवास घडवावा अशी कल्पना मला गेल्या वर्षीच आली होती, जेव्हा ते मुलांना ट्रेनने आग्राला घेऊन गेले होते. त्यावेळेस तेथून परत येत असताना काही मुलांच्या विमान प्रवासाबाबतच्या गोष्टी ऐकल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली. त्यामुळे तिकिटांचा दर कमी असताना स्लॉटकडे त्यांचे लक्ष होते आणि त्यावेळेसच त्यांनी तिकिटांची बुकिंग केली होती.

दिल्लीला जाताना विमान प्रवास आणि परतीचा प्रवास त्यांनी ट्रेनने केला, असे मुख्याध्यापक किशोर यांनी सांगितले. विमान प्रवास करून आल्यानंतर विद्यार्थी खूप आनंदी आहेत. सतत फ्लाइटबद्दल बोलत असतात असे त्यांनी सांगितले. शाळेतील मुलांनी आपल्या मुख्याध्यापक सरांचे मनापासून आभार देखील मानले आहेत. सर्व मुलांनी त्यांचे भरभरून कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page