भारतातील या गावाला म्हणतात ‘IAS ची फॅक्टरी’, केवळ 75 घरे असून, तब्बल 40हून अधिक लोक आहेत आयएएस अधिकारी

देशभरातील बरेच उमेदवार देशाच्या प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहत असतात. रात्रंदिवस मेहनत करत असतात. आपले शहर सोडून दुसऱ्या शहरात जाऊन लाखो रुपयांचे कोचींग घेत असतात. यात काहींचे स्वप्न पूर्ण होते, तर काहींचे नाही. मात्र, आज आपण अशा एका गावाबद्दल जाणून घेणार आहोत ज्या गावाने देशाला अनेक मोठे अधिकारी दिले आहेत. या गावाविषयी जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु, हे खरे आहे…

जौनपूर जिल्ह्यातील माधोपट्टी हे गाव यूपीची राजधानी लखनौ पासून सुमारे 300 किमी अंतरावर आहे. या गावाला ‘आयएएसची फॅक्टरी’ असे म्हंटले जाते. या गावाने देशाला अनेक मोठमोठे अधिकारी दिलेले आहेत. या गावातील जवळपास प्रत्येक घरातून एक तरी अधिकारी बनलेला आहे. या अनोख्या गावाचे किस्से जगभर ऐकायला मिळत असतात. गाव पाहण्यासाठी लोक लांबून येऊन भेट देत असतात. या गावातील उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची देशभरात मोठ्या पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.

माधोपट्टी या गावात फक्त 75 घरे आहेत आणि यांपैकी तब्बल 40 लोक आयएएस अधिकारी, आयएफएस, पीसीएस, आयपीएस आणि पीबीएस अधिकारी आहेत. या गावातून मोठ्या पदांवर तब्बल 51 जणांची नियुक्ती झालेली आहे. या गावातील विद्यार्थ्यांचे यश केवळ नागरी सेवेपुरते मर्यादित नाही तर ते इस्रो आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयातही आपली सेवा देत आहेत.

माधोपट्टी या गावातील विद्यार्थ्यांचा अधिकारी होण्याचा प्रवास हा 1914 पासून सुरू झाला होता. 1914 मध्ये माधोपट्टी येथील मुस्तफा हुसेन हे पहिले आयएएस अधिकारी बनले. त्यांनतर 1951 मध्ये इंदू प्रकाश यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करून दुसरा क्रमांक पटकावला. यानंतर त्यांची आयएफएस पदासाठी निवड करण्यात आली. ते अनेक देशांचे राजदूत राहिले आहेत. त्यांच्या नंतर त्यांचे चार भाऊ देखील आयएएस अधिकारी झाले.

पुढे 1953 मध्ये विद्या प्रकाश आणि विनय प्रकाश यांनी UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले. विनय सिंह हे बिहारचे मुख्य सचिव राहिले आहेत. यानंतर 1964 मध्ये अजय आणि छत्रपाल यांनी UPSC मध्ये यश मिळवले. तसेच 1968 मध्ये शशिकांत सिंग आयएएस अधिकारी बनले.

त्यानंतर हळूहळू त्यांच्या पिढ्या आयएएस अधिकारी बनू लागले. आणि अशा प्रकारे या गावातील आयएएस अधिकारी होण्याची मालिका सुरूच राहिली. त्यामुळे या गावाला ‘आयएएसची फॅक्टरी’ असे म्हटले जाऊ लागले. या गावातून केवळ पुरुषच अधिकारी झाले नाहीत, तर मुली आणि सुनांनीही यात बाजी मारली आहे. अनेक महिलांनी आयएएस अधिकारी होऊन आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे. 1980 मध्ये आशा सिंह या पहिल्या अधिकारी बनल्या. त्यांनतर 1982 मध्ये उषा सिंह आणि 1983 मध्ये इंदू सिंह यांनी देखील अधिकारी बनून गावचे नाव उज्ज्वल केले.

या गावातील अनेक लोक इस्रो आणि भाभा संशोधन केंद्रात देखील काम करत आहेत. जया सिंग या जागतिक बँकेत कार्यरत आहेत. तसेच या गावाने आपल्या देशाला मोठे शास्त्रज्ञ देखील दिलेले आहेत. गावातील डॉ. नीरू सिंग आणि लालेंद्र प्रताप सिंग हे भाभा अणु संशोधन केंद्राचे उत्कृष्ट शास्त्रज्ञ आहेत. याचप्रमाणे डॉ. ज्ञानू मिश्रा हे देखील इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आहेत.

अशा प्रकारे प्रशिक्षणाशिवाय केवळ कठोर परिश्रमाने सगळ्यांनी यश संपादन केले आहे. माधोपट्टी या गावात शेततळे कमी असून लोकांचे अभ्यासावर विशेष लक्ष असते, असे म्हंटले जाते. येथे विद्येची देवी सरस्वती माता वास्तव्य करते, असे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page