मुलीकडची मंडळी मुलाचे घर पाहण्यासाठी आली आणि चक्क त्याच दिवशी लग्न लावून गेली!

आता सगळीकडेच लग्नसराई सुरू आहे. लग्न म्हटले की घरात अगदी उत्साहाचे वातावरण असते. सगळ्यांचीच लगबग चालू झालेली असते. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पाहुण्यांचा पाहुणचार त्यांचे मानपान, पत्रिका वाटप, कपडे खरेदी या व आशा अनेक गोष्टी ह्या लग्नाच्या 15-20 दिवस आधीच सुरू करतात आणि यावर बक्कळ पैसा देखील खर्च केला जातो.

आपले लग्न अगदी धूमधडाक्यात पार पाडावे असे अनेक वधुवरांची अपेक्षा असते. मात्र, याउलट राऊत व डगले कुटुंबियांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांनी एकाच दिवशी सर्व विधी पार पाडून लग्न सोहळा संपन्न केला आहे. यामुळे दोन्ही कुटुंबाचा खर्च वाचून त्यांनी समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

ही घटना निरगुडसर येथे घडली विशेष म्हणजे यात मुलीकडेचे सदस्य मुलाचे घर पाहण्यासाठी आले आणि चक्क लग्नच लावून गेले. 13 डिसेंबर रोजी हा विवाह सोहळा पार पडला असून या विवाहात अनावश्यक खर्च टाळला गेला आणि सर्व लग्नाच्या विधी एकाच दिवशी पार पाडल्या. यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी दोन्ही कुटुंबीयांचे कौतुक केले आहे.

निरगुडसर येथील रहिवासी असलेले सुरेश राऊत यांचा मुलगा मंगेश राऊत व संगमनेर येथील रहिवासी असलेले रवींद्र तानाजी डगले यांची कन्या सुजाता डगले यांचा विवाह 13 डिसेंबर रोजी संपन्न झाला. काही दिवसांपूर्वी निघोज या ठिकाणी एका द’श’क्रि’या कार्यक्रमात डगले कुटुंबीय व राऊत कुटुंबीय यांची भेट झाली होती.

त्या भेटीदरम्यान त्यांच्यात विवाहाविषयी बोलणे झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलाकडचे लोक मुलीला पाहण्यासाठी गेले. त्यानंतर मुलीकडचे कुटुंबीय 13 डिसेंबर रोजी निरगुडसर येथे मुलगा व त्याचे घर पाहण्यासाठी आले होते. यादरम्यान मुलींच्या कुटुंबीयांना मुलगा तसेच त्याचे घर सगळ्याच गोष्टी आवडल्याने त्यांची पुढची बोलणी सुरू झाली.

मंगेशला वडील नसल्याने मुलाकडचे जबाबदार व्यक्ती म्हणुन मुलाचे काका गणपत राऊत आणि चुलत भाऊ महेश राऊत तसेच इतर मोठे सदस्य लग्नाची बोलणी करत होते. त्यावेळेस आपली दोन्ही कुटुंबे सर्वसामान्य आहेत त्यामुळे साधेपणाने लग्न करू असे सगळ्यांचे मत होते. यानंतर मुलाकडचे लोक म्हणाले की आजचा मुहूर्त चांगला आहे त्यामुळे आपण आजच लग्नाच्या सर्व विधी पूर्ण करून लग्न लावून घेऊ तसेच याबाबत सगळे नियोजन आम्ही करू असेही सांगितले.

यावर मुलीकडच्यांनीही होकार दिला आणि लगेच दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या जवळच्या नातेाइकांशी संपर्क साधून साखरपुडा आणि लग्नाची वेळ सांगितली. त्यांनतर दोन्ही कुटुंबांनी एकाच ठिकाणी मुलीचा बस्ता घेतला. तोपर्यंत नातेवाईक हजर झाले.

नातेवाईक, आजूबाजूचे लोक तसेच कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये निरगुडसर येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात दोघांचा साखरपुडा पार पडला. त्यांनतर लगेचच हळदीचा कार्यक्रम झाला आणि जेवण देखील उरकले.

यानंतर सायंकाळी 5.30 च्या सुमारास सगळ्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा अगदी साध्यारीतीने पार पडला. एका दिवसात लग्न ठरवून त्याच दिवशी लग्न करून दोन्ही कुटुंबांनी अनावश्य खर्च टाळून साधेपणाने लग्न लावून समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page