प्रभू राम आणि सीता मातेच्या मुर्तीसाठी नेपाळहून दगड आणण्यामागे फक्त धार्मिकच नव्हे तर काही भौगोलिक कारणही आहेत..

भगवान रामाची नगरी अयोध्या ही हजारो महापुरुषांचे कार्यस्थान आहे. ही पवित्र भूमी हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या अयोध्या नगरीमध्येच भगवान श्रीरामाचा जन्म झाला आहे. आता त्यांच्या जन्मभूमीवर भव्य राम मंदीर उभारण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष अयोध्येतील या भव्य दिव्य अशा राम मंदिरावर आहे.

सध्या या मंदिराचे बांधकाम सुरू असून मिळालेल्या माहितीनुसार, 2024 पर्यंत हे राम मंदिर आपणा सर्वांसाठी दर्शनाकरीता खुले होईल असे सांगीतले जात आहे. आता राम मंदिरांच्या गाभाऱ्यात प्रभू राम आणि सीता मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. परंतु, या पवित्र मूर्ती कोणत्या दगडापासून बनवायच्या याचा बरेच दिवस शोध सुरू होता. या पवित्र मूर्ती तयार करण्यासाठी योग्य दगडासाठी शोधकार्य चालू असताना अखेर हा शोध थांबला तो नेपाळच्या पवित्र शाळीग्राम दगडापर्यंत..

नेपाळमध्ये सापडलेले हे दोन्ही शाळीग्राम तब्बल 6 कोटी वर्षे जुने आहेत. याच दगडांपासून भगवान राम आणि सीता यांच्या मूर्ती बनवल्या जाव्या असा निर्णय घेतला. अखेर हे दोन्ही शाळिग्राम दगड नेपाळहून अयोध्येत आणण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही शाळिग्राम दगड नेपाळहून अयोध्येत येईपर्यंत संपुर्ण प्रवासात ठिकठिकाणी अनेक लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. हे आपण सर्वांनी प्रसारमाध्यांद्वारे पाहिलेच असेल.

हे दगड नेपाळहुन उत्तर प्रदेशपर्यंत आणण्यामागचे कारण म्हणजे हा शाळिग्राम दगड फक्त नेपाळमध्येच आढळतो. सुरुवातीला राम मंदिर बांधकाम ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, भगवान राम आणि सीता मातेची मूर्ती पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवली जाणार असल्याचे जेव्हा ठरले तेव्हा काही लोकं बनावट शाळीग्राम दगड घेऊन आले होते. मात्र, त्या दगडांची योग्य पारख झाल्यांनतर शेवटी नेपाळमध्ये गंडकी नदीत खरा शाळीग्राम सापडल्यांनतर त्या शिळा अयोध्यामध्ये आणल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, गंडकी नदीच्या पात्रातून जेव्हा दोन मोठ्या शाळीग्राम शिळा बाहेर काढण्यात आल्या, यात नेपाळ सरकारचाही सहभाग होता. त्यांच्या परवानगीनंतरच नदीतील शिळा बाहेर काढण्यात आल्या. या दोन्ही शाळीग्रामचे वजन 26 आणि 14 असे टन आहे. तसेच हे सात फूट लांब आणि पाच फूट रुंद आहेत अशी ही माहिती देण्यात आली आहे. हे दोन्ही शाळीग्राम तब्बल 6 कोटी वर्षे जुन्या असल्याचा दावा राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांनी केला आहे.

त्यामुळे रामसीतेची मूर्ती तयार करण्यासाठी या शाळीग्राम शिळांची निवड करण्यात आली आहे. ह्याच शिळा निवडण्यामागे देखील धार्मिक महत्व आहे. त्यामुळे ह्या शिळांचा वापर प्रभू राम आणि सीता मातेची मूर्ती बनवण्यासाठी केला जाणार आहे. याचे कारण म्हणजे हिंदू धर्मात अनेक दगड शुभ मानले जातात आणि त्यातलाच एक म्हणजे शाळीग्राम. विषेश म्हणजे नेपाळच्या गंडकी नदीमध्येच हे विशेष प्रकारचे शाळीग्राम आढळतात. यावर चक्र, गदा असे चिन्ह दिसतात.

यामुळे हिंदू धर्मानुसार शाळीग्राम दगड हे भगवान श्री विष्णूचे स्वरूप मानले जाते. यामागील कथा म्हणजे जालंदर नावाचा एक असुर होता ज्याची पत्नी वृंदा ही खूप पतिव्रता होती. तिच्या पुण्यप्रभावामुळे जालंदरला देवही हारवू शकत नव्हते. त्यामुळे त्याची पत्नी वृंदा हिला नष्ट केल्याशिवाय जालंदरचा पराभव होणे शक्य नव्हते हे देवांनाही कळले होते.

यामुळे श्रीविष्णूंनी जालंदराच्या अनुपस्थितीमध्ये त्याचेच रूप धारण करून त्याच्या महाली जाऊन वृंदेचे सत्व हरण केले. हे वृंदेला समजल्यानंतर वृंदेने देहत्याग केला आणि देहत्याग करताना तिने श्रीविष्णूंना शाळीग्राम होण्याचा शाप दिला. तेव्हा विष्णून देवांनी तिला तुळस होण्याचा प्रतिशाप दिला.

परंतु, वृंदा खूप पतिव्रता होती त्यामुळे श्रीविष्णूंनी संतुष्ट होऊन तिला एक वरही दिला. तो म्हणजे, नेहमी तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची आठवण म्हणून शाळीग्राम, म्हणजेच श्रीविष्णूशी तुळशीचे लग्न लावले जाईल. म्हणूनच श्रीविष्णूंना शाळीग्राम स्वरूप मानले जाते आणि त्यांची पूजा केली जाते तसेच तुळशीचे लग्न शाळीग्राम दगडाशी लावले जाते.

शाळीग्राम दगडाचे 33 प्रकार असून त्यापैकी 24 प्रकार हे भगवान श्रीविष्णूच्या 24 अवतारांशी संबंधित आहेत अशी धार्मिक मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार यामागे काही भौगोलिक स्थान देखील आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ आणि जीवाश्मशास्त्रज्ञ असे मानतात की, या दगडावर ज्या किड्याच्या आकारासारख्या खुणा दिसतात त्यावरून शाळीग्राम दगड हा अमोनाईट्स नावाचा जीवाश्म होता.

अमोनाईट्स म्हणजे सुमारे 400 दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा डायनासोरसह अनेक जिवाश्म अस्तित्वात होते त्यातलाच एक म्हणजे अमोनाईट्स. हा एक सागरी प्राणी असून तो ऑक्टोपस, आणि नॉटिलसच्या या प्रजातींपैकी एक होता. तो शेल्सच्या आकाराचा होता. कालांतराने डायनासोर तसेच अनेक प्रजाती नामशेष झाल्या त्यात अमोनाईट्सही नष्ट झाले.

त्यांनतर त्यांच्या हाडांचे जे अवशेष असतात त्यावर वर्षांनुवर्षे गाळ, वाळूचे कण तसेच मातीचे थर तयार होऊन हळूहळू त्याचे रूपांतर एका दगडात किंवा खडकात होते. आजही जसे डायनोसॉरचेच्या अंड्याचे दगडी अवशेष सापडतात तसेच अमोनाईट्सचे अवशेषही शिळाग्राम दगडाच्या स्वरूपात आढळून येतात. सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या भूमंडलात बदल झाले होते. तेव्हा इंडियन प्लेट्स आणि युरेशियन प्लेट्स एकमेकांवर आदळल्या होत्या आणि त्यामुळे हिमालयाची निर्मिती झाली.

पृथ्वीच्या टेकनॉटिक्स प्लेट्स जेव्हा सरकल्या तेव्हा येथील समुद्रातील जीवाश्म हिमालयाच्या पायथ्याशी जमा झाले होते. गंडकी नदी ही हिमालयाच्या पायथ्याशीच आहे म्हणून हे शाळीग्राम दगड नेपाळच्या गंडकी नदीतच आढळतात. वर्षनुवर्षे तयार होते गेलेले हे शाळीग्राम दगड खूप मजबूत असतात, त्यामुळे कारागीर बारीकसारीक गोष्टी त्यावर उत्तमप्रकारे कोरू शकतो.

याआधीही अयोध्येतील रामाची मूर्ती ही या शिळेवरच कोरलेली आहे. तसेच भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या देखील अनेक मंदिरातल्या पवित्र मूर्ती याच दगडापासून कोरलेल्या आहेत. आणि म्हणूनच अयोध्येतील प्रभू श्रीराम आणि सीतामातेची मूर्ती देखील याच दगडापासून बनवली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page