लोकांना प्रगती बघवत नव्हती, समाजातील लोकांचा त्रास सहन करत पतीच्या साथीने केली यशस्वी शेती..

सध्याच्या युगात प्रत्येक क्षेत्रात महिला सहभागी होताना आपण पाहत आहोत. सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये देखील काही भागांमध्ये अजूनही स्त्रियांना आपल्या सन्मानासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. असे असतानाही अनेक स्त्रिया संघर्ष करत समाजापुढे एक उत्तम उदाहरण बनत आहेत. आज आपण अशाच एका यशस्वी स्त्रीच्या संघर्षाची कहाणी जाणून घेणार आहोत.

पुष्पा झा या मूळच्या दरभंगा या जिल्ह्यातील बलभद्रपूर गावच्या आहेत. त्यांचे पती राजेश हे पेशाने शिक्षक आहेत. सध्या त्या मशरूम लागवडीसोबतच महिलांना मशरूम लागवडीचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिध्द आहेत. पुष्पा यांना घरी बसून राहण्याऐवजी काहीतरी काम करण्याची इच्छा होती. यादरम्यान पुष्पा यांच्या पतीला मशरूमच्या लागवडीची माहिती समजली. याबद्दल त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले असता पुष्पा यांनी देखील हे काम करण्याच्या निर्णय घेतला.

त्यानंतर या दाम्पत्याने समस्तीपूर येथील पुसा विद्यापीठातून मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेथील जागा भरल्या होत्या. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला मात्र, अखेर दोघांचीही नोंदणी होऊन दोघांनीही सहा दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे ते पुसा विद्यापीठातून मशरूम लागवडीचे प्रशिक्षण घेऊन घरी परतत असताना त्यांनी काही मशरूम खरेदी केले.

त्यांना या मशरूम चव आवडली. यामुळे नंतर त्यांनी मशरूमची लागवड करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी पुसा विद्यापीठातूनच 1000 पिशव्या आणल्या आणि शेतात झोपडी बनवून मशरूमची लागवड करण्यास सुरुवात केली. एका पिशवीत त्यांनी 800 ते 1000 ग्रॅम मशरूम ठेवले होते. अशा प्रकारे त्यांनी मशरूमचे उत्पादन घेण्यास सुरुवात केले.

सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे आणि मशरूमची कमी मागणी यामुळे या दामपत्याला तोटा सहन करावा लागला. अनेक वेळा त्यांना गावकऱ्यांचे टोमणेही सहन करावे लागले. चांगला नफा मिळत नसल्यामुळे पुष्पा यांनी मशरूम स्पॉन म्हणजेच मशरूम सीड बनवण्याचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी पुन्हा पुसा विद्यापीठामध्ये एका महिन्याचे प्रशिक्षण घेतले.

यादरम्यान गावातील काही ग्रामस्थांनी त्यांची मशरूम शेतीची झोपडी जाळली होती. पुष्पा यांना या घटनेची माहितीही नव्हती, कारण पुष्पा परत येण्यापूर्वीच त्यांच्या पतीने नवीन शेत तयार केले होते. अशा प्रकारे तब्बल पाच वर्षे अशा संकटांचा सामना केल्यानंतर त्यांची परिस्थिती हळुहळू स्थिर होऊ लागली. सध्या बिहारमध्ये मशरूमला खूप मागणी असल्यामुळे आता त्यांचे उत्पन्नही वाढले आहे.

पुष्पा झा या 2010 पासून मशरूमची लागवड करत आहेत. सध्या ते दररोज सुमारे 10 किलो मशरूम तयार करतात. आणि ते 100 ते 150 रुपये प्रति किलो या दराने विक्री करतात. यामुळे त्यांना दररोज किमान 1000-1500 रुपये  नफा मिळतो. जेव्हा मशरूमची जास्त विक्री होत नाही तेव्हा ते पुन्हा त्यावर प्रक्रिया करतात आणि त्यापासून लोणचे, बिस्किटे, टोस्ट, चिप्स इत्यादी पदार्थ बनवतात. ह्या पदार्थांना बाजारात चांगला भाव मिळतो.

2010 ते 2017 पर्यंत पुष्पा यांनी मशरूम लागवड प्रक्रियेमध्ये बरीच प्रगती केली आहे. यामुळे पुष्पा यांना पुसा कृषी विद्यापीठाने मशरूम लागवडीच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘अभिनव किसान’ पुरस्कार बहाल केला आहे. आत पुष्पा यांना पाहून गावातील इतर महिलाही त्यांच्याकडे  प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

त्या महिलांना मोफत प्रशिक्षण देतात आणि त्यासोबतच त्या महिलांना मशरूमच्या मोफत बियाही देतात, असे त्या म्हणतात. त्यांनी 20000 हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिले आहे. आज पुष्पा झा यांनी मशरूम शेती करून मोठे स्थान प्राप्त केले आहे. त्यांनी सामाजिक तिरस्काराचा सामना करत आज संपत्ती आणि प्रसिद्धी दोन्ही प्राप्त केले आहे. यामुळे त्या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page