एकाच कुटुंबातील चारही भावंडांनी केली UPSC परिक्षा उत्तीर्ण, आज सर्व आहेत IAS – IPS अधिकारी

जर तुम्ही एखादे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तुम्ही झोकून देऊन मेहनत केली तर तुम्ही नक्कीच यशापर्यंत पोहोचाल. आज आपण अशीच एक कहाणी पाहणार आहोत ज्यात, चार भावंडांनी आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील अनिल मिश्रा हे आपल्या पत्नीसह छोट्याश्या घरात राहत होते. त्यांना चार मुले आहेत. दोन मुलगे आणि दोन मुली.

योगेश, लोकेश, माधवी आणि क्षमा अशी त्यांची नावे आहेत. अनिल मिश्रा हे ग्रामीण बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करत होते. अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी या दोघांनाही आपल्या चारही मुलांनी मोठे होऊन अधिकारी व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळे लहानपनापासूनच त्यांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीच कमतरता पडू दिली नाही. तसेच चारही मुले लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होते.

चारही भावंडांनी हिंदी माध्यमाच्या शाळेतून बारावीपर्यंतचे शिक्षण लालगंज येथील राम अंजोर मिश्रा इंटर कॉलेजमधून घेतले. चार भावंडांमध्ये योगेश हे सर्वात मोठा मुलगा. युपीएससी परिक्षा क्लिअर करणाऱ्या चौघांची कहाणी योगेशपासूनच सुरू झाली.

योगेश यांनी लालगंजमधून 12 वीपर्यंतचे शिक्षण घेतले, त्यानंतर ते अलाहाबादला प्रयागराजमधील मोतीलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बीटेकचे शिक्षण घेण्यासाठी गेला. पुढे त्यांना कॉलेजमधून सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी मिळाली. 2012 पर्यंत ते नोएडामध्ये नोकरी करत होते. योगेश यांचे अभियंता होण्याचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. त्यांनी कधीही आयएएस होण्याचा विचार केला नव्हता.

नोएडामध्ये नोकरी करत असताना इकडे त्यांच्या दोन्ही धाकट्या बहिणी क्षमा आणि माधवी या दिल्लीमध्ये राहून यूपीएससी परीक्षेची तयारी करत होत्या. त्यावेळेस योगेश हे रक्षाबंधनसाठी घरी गेले होते. त्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या दोघांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले होते.

परंतु त्या दोघींनाही अपयश आले होते. अयशस्वी झाला म्हणून हार न मानता त्यांना पुन्हा मेहनत करण्यास योगेश यांनी प्रोत्साहित केले आणि त्याच दिवशी योगेश यांनी आपण प्रथम आयएएस होऊन नंतर आपल्या लहान भावंडांना मार्गदर्शन करू असा त्यांनी निश्चय केला.

यानंतर त्यांनी युपीएससी परिक्षेचा अभ्यास करण्यास सुरूवात केली. नोकरी सोडून त्यांनी एक वर्ष पूर्ण लक्ष आपल्या अभ्यासावर केंद्रित केले आणि 2013 मध्ये योगेश पहिल्याच प्रयत्नात आयएएस झाले. योगेश मिश्रा हे कोलकाता येथील राष्ट्रीय तो’फ आणि दा’रु’गो’ळा निर्मिती क्षेत्रात प्रशासकीय अधिकारीही राहिले आहेत.

पुढे योगेश यांनी आपल्या दोन बहिणी आणि लहान भावाला परीक्षा आणि नोट्स समजून घेऊन प्रशिक्षण दिले. यानंतर त्यांची बहीण माधवी यांनी 2015 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या आयएएस अधिकारी बनल्या.

माधवी यांना झारखंड कॅडर आयएएस म्हणून नियुक्त केले गेले. माधवी मिश्रा यांना धनबाद, जमशेदपूर, हजारीबाग, लातेहार, रामगड येथे पहिली नियुक्ती मिळाली. सध्या माधवी मिश्रा या रामगड येथे डीएम म्हणून आपले कार्य बजावत आहेत.

यादरम्यान योगेश यांचा धाकटा भाऊ लोकेश यांनी देखील 2015 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी बनले. लोकेश यांनी यापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे. लोकेश यांची यूपी पीसीएसमध्ये बीडीओ या पदासाठी निवड झाली.

त्यांनतर योगेश यांची लहान बहीण क्षमा देखील 2015 मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. क्षमा यांची 2015 मध्ये डेप्युटी एसपी म्हणून निवड झाली होती. मात्र, यावर त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी 2016 मध्ये पुन्हा परीक्षा दिली आणि अखेर त्या आयपीएस अधिकारी झाल्या. त्यांची युपी पीसीएसमध्ये डीवायएसपी (DYSP) पदावर नियुक्ती करण्यात आली.

अशा प्रकारे या चारही भावंडांनी आपल्या आई-वडिलांचा आणि गावाचा अभिमान वाढवला आहे. आज या भावंडांनी ग्लोरी आयएएस नावाचे कोचिंग सेंटर देखील सुरू केले आहे, जिथे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. त्यांनी गेल्या 7/8 वर्षाच्या कालखंडामध्ये 100 हून अधिक तरुणांना युपीएससी परीक्षा पास होण्यास मदत केली आहे. या चारही भावंडांनी सगळ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. हे चारही जण अनेक तरुणांचे प्रेरणास्थान बनले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page