सांगलीच्या ऊस तोड कामगाराच्या मुलाने शाळा शिकत 5 गायी घेतल्या, आता करत आहे लाखोंची उलाढाल

सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील कुल्लाळवाडी येथे राहणारा संतोष माने हा सोळाव्या वर्षांचा असून तो इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. सांगली जिल्ह्यातला जत तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून नेहमी ओळखला जातो. या तालुक्यातली अनेक कुटुंब ऑक्टोंबरच्या आसपास ऊस तोड मजुरीसाठी दरवर्षी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन स्थलांतर करत असतात.

अशाच कुटुंबापैकी एक असेलेले माने कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये संतोष, त्याचे आई-वडील, त्याचा भाऊ आणि दोन मोठ्या बहिणी असा परिवार आहे. त्याचे आई-वडील देखील इतर कुटुंंबासारखे ऊसतोड मजुरीला गावाबाहेर जायचे.

संतोषला त्यांच्या आईवडीलांना हातभार लावावा असे वाटत होते. म्हणून त्याने वडिलांकडे एक गायी घेण्यासाठी हट्ट धरला. यासाठी वडिलांनी सुरुवातीला त्याला नकार दिला पण नंतर काही दिवसांनी ऊस तोडणीसाठी घेतलेली 65 हजार रुपयांची उचल रक्कम त्यांनी संतोषला दिली.

यातून संतोष याने एक जर्सी गाय विकत घेतली. सुरुवातीला यातून त्याला रोज 24 लीटर दूध मिळायचे. त्यावेळी दुधाला साधारण 22 रुपये इतका दर त्याला मिळायचा. महिन्याचा खर्च वजा करता त्याला 9 हजार रुपये नफा व्हायचा. शिक्षणासोबत गायपालन करणे त्याला फारसे अवघड जात नव्हते.

पुढे संतोषला या दुग्धपालनाच्या व्यवसायात त्याच्या कुटुंबियांनी देखील साथ दिली. या एका गायीपाठोपाठ त्याने अजून 4 गायी विकत घेतल्या. आता त्याला पाच गायी दररोज सरासरी 105 लीटर दूध देतात. दररोज त्यांना 35 रूपये लीटर या दराने साधारण 3 हजार 600 रूपये मिळतात.

महिन्याला त्याच्या खात्यामध्ये या दुधाचे पैसे जमा होत असतात. त्याला आता एक लाखाच्या आसपास उत्पन्न मिळते, त्यातून बाकीचा खर्च वजा करून त्याला साधारण 70 ते 80 हजार रूपये नफा मिळतो,  असे संतोष सांगतो.

दुग्धपालनाचा व्यवसाय करताना या व्यवसायाचा परिणाम त्याने आपल्या अभ्यासावर कधीही होऊ दिलेला नाही. त्याचा रोजचा दिनक्रम ठरलेला असतो. रोज सकाळी तो पाच वाजता उठतो नंतर गोठ्याची साफसफाई करून गायींना चारा पाणी देतो. त्यानंतर अकरा वाजता शाळेत जातो.

संध्याकाळी घरी परतल्यावर पुन्हा गायींना चारा घालून गोठ्याची साफसफाई करतो तसेच धारा ही तो काढतो. त्यानंतर दूध डेअरीमध्ये घेवून जातो. असा त्याचा दिनक्रम असून यात त्याला त्याच्या कुटुंबियांनी देखील चांगली साथ दिली आहे.

या व्यवसायातून फायदा झाल्यामुळे याचा उपयोग त्यांच्या शेतीकामावरही झाला आहे असे संतोष सांगतो. त्याच्या वडिलांनी आता दोन लाख रुपये खर्च करून शेतामध्ये दोन विहिरी पाडल्या आहेत. दोन्हीही विहिरींना चांगले पाणी लागलेले आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादनही चांगले घेतले जात आहे.

यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. संतोषने आपल्या आईचे ऊस तोडणीसाठी गावोगावी जाणे पूर्णपणे थांबवले आहे. तसेच पुढच्या काही दिवसांत वडिलांचे ही थांबेल, असे त्याने सांगितले आहे.

“आमचा भाग हा दुष्काळी असल्यामुळे आम्ही लहान असल्यापासूनच ऊस तोडणीचे कामे करायचो. लग्नानंतर घराची जबादारी आणि मुले यांना जगवण्यासाठीही हे गरजेचेच होते. आधी झोपडीमध्ये आम्ही राहायचो. पुढे सरकारच्या इंदिरा घरकुल आवास योजनेतून आम्हाला घर बांधून मिळाले. मोठ्या मुलाला आम्ही आश्रम शाळेत ठेवले आणि लहान मुलगा आणि दोन मुली आमच्या सोबत घरी गावातच राहायच्या,” असे संतोषच्या वडिलांनी सांगितले.

संतोष लहानपणी आई-वडिलांसोबत ऊसतोडीसाठी जायचा. त्यामुळे तो पहिली इयेत्ते मध्ये शाळेत जाऊ शकला नव्हता. जिल्हा परिषद शिक्षकांनी शाळाबाह्य मुलांचा शोध घेत असताना त्यांना संतोष आढळून आला आणि त्यांच्या मदतीने संतोषला शिक्षण हक्क कायद्यानुसार त्याचे नाव शाळेत नोंदवले गेले आणि दुसरीमध्ये त्याचा प्रवेश करून दिला.

कमी वयात मुलांच्या हातात पैसे आले की मुले वाईट मार्गाला लागतात, असे म्हणतात. परंतु संतोष शिक्षणासोबत आपला व्यवसाय देखील उत्तम प्रकारे करत आहेत. भविष्यामध्ये त्याला 30 गायींचा एक फिरता गोठा बणवण्याचे त्याचे ध्येय आहे. यासाठी त्याने आता वाटचाल सुरू केलेली आहे. त्याला एक यशस्वी उद्योजक बनायचे आहे.

संतोष माने याने अवघ्या सोळाव्या वर्षी एका गायीपासून सुरूवात करत दूध विक्री व्यवसायातून आज तो लाखो रुपयांची उलाढाल करत आहे. पण याबद्दल त्याला अजिबात गर्व नाही. संतोष मानेने कमी वयात करून दाखवलेली ही प्रगती थक्क करणारी आहे. अनेकांसाठी संतोष प्रेरणादायी ठरलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page