जिथे वडील कॉन्स्टेबल होते, त्याच ठिकाणी आयपीएस मुलगा SP बनून आला..

आपल्या मुलाने जीवनात यशस्वी व्हावे असे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. आपण अनेक वेळा पाहिले असेल की, मुले आपल्या पालकांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून जीवनात पुढे जात असतात. परंतु, आज आपण अशी एक गोष्ट जाणून घेणार आहोत जेथे कर्तव्याच्या वेळी वडील स्वतःच्या मुलाला सलाम करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये हा अनोखा प्रकार समोर आला होता. जेथे वडील कॉन्स्टेबल होते आणि त्याच ठिकाणी त्यांचा आयपीएस झालेला मुलगा एसपी म्हणून तैनात झाला होता.  काही वर्षांपूर्वी आयपीएस अनुप कुमार सिंग यांची बदली  लखनौला करण्यात आली. लखनौच्या उत्तर भागात त्यांना एसपी म्हणून तैनात करण्यात आले. तेथे विभूतीखंड पोलिस स्टेशनही आहे जिथे अनुप कुमार सिंग यांचे वडील जनार्दन सिंग हे हवालदार म्हणून आपले कार्य बजावत होते.

विभूतीखंड हे लखनौ मधील महत्वाचे पोलिस ठाणे आहे. येथे इंदिरा गांधी फाउंडेशन, माहिती आयोग, मानवाधिकार आयोग, उच्च न्यायालय अशा अनेक महत्वाच्या सरकारी संस्था या क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे अनुप कुमार सिंग हे सतत कामानिमित्त येथे येत असतात. त्यामुळे त्यांना विभूतीखंड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या त्यांच्या वडिलांसमवेतही काम करावे लागते.

या दरम्यान वडील जनार्दन सिंग सांगतात, “माझा मुलगा एसपी आहे, त्यामुळे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्या हाताखाली काम करण्यास मला फार आवडते. जेव्हा मुलगा आयपीएस झाला तेव्हा आम्हा सर्व कुटुंबीयांना खूप आनंद झाला होता. आमच्या दोघांची पोस्टिंग एकाच ठिकाणी होणे हा देखील सगळ्यांसाठी खूप आनंददायी क्षण होता.

यावर अनुपकुमार सिंग म्हणतात की, “मी माझे कर्तव्य आणि माझे वैयक्तिक जीवन हे दोन्ही नेहमी वेगळे ठेवतो. मी माझे कर्तव्य निभावत असताना घरी मी वडिलांच्या पायाला स्पर्श करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो. तसेच या क्षेत्रात मी माझे कर्तव्य बजावत असताना सगळ्या प्रोटोकॉलसचे नीट अनुसरण करत असतो.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page