वडील गवंडी कामगार तर आई शिवणकाम करते, परिस्थितीवर मात करत अहमदनगरच्या तरुणाने UPSC परिक्षा केली उत्तीर्ण..

अहमदनगर येथील बुरूडगाव या गावाचा रहिवासी असलेला विशाल पवार हा 10 बाय 10 च्या खोलीत आपले वडील राजेंद्र पवार आणि आई सुनीता पवार तसेच आपल्या आजीसोबत राहातो. विशाल लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहे. त्याने आपले प्राथमिक शिक्षण बुरूडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केले.

त्यानंतर 10 वी पर्यंतचे शिक्षण त्याने अहमदनगर येथील रुपीबाई बोरा या विद्यालयात घेतले. पुढे विशालने अहमदनगर मधील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. यादरम्यान घरची परिस्थिती बेताची असल्याने महागडे कोचिंग लावणे विशालला शक्य नव्हते.

अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबावर आपल्या शिक्षणाचा भार व्हायला नको म्हणून विशालने एक वर्ष एका खासगी कंपनीत नोकरी केली आणि त्यातून मिळालेल्या पैशातून त्याने पुण्याच्या काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रवेश घेतला.

यादरम्यान विशालने पदवी शिक्षण घेत असतानाच यूपीएससी परिक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्याने त्याची तयारी करण्यास देखील सुरूवात केली. चांगली तयारी करून त्याने परिक्षा दिली मात्र, विशालला पहिल्या प्रयत्नात अपशय सहन करावे लागले. मात्र, त्याने हार मानली नाही. त्याने अजून जोमाने तयारीला सुरुवात केली.

त्यांनतर उत्तम तयारी करून विशालने 10 एप्रिल रोजी सीडीएसची परीक्षा दिली. अखेर यामध्ये त्याने घवघवीत यश मिळवले. त्याच्या या यशानंतर त्याचे आईवडील खूप खुश झाले. पुढे सप्टेंबर महिन्यात बेंगलोर येथे त्याची मुलाखतीसाठी निवड झाली. त्यामध्येही विशाल उत्तीर्ण झाला. तसेच मेडीकल आणि बाकी सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मागच्या आठवड्यात त्याचा निकाल जाहीर झाला.

यामध्ये विशालने आर्मीसाठी देशातील टॉप 100 मध्ये 61 वा नंबर पटकावला आहे. तसेच नेव्हीसाठी त्याचा 100 मध्ये 20 वा नंबर आला आहे. विशाल लहानपणापासूनच आर्मीत जाण्याचे स्वप्न पाहत होता. त्यामुळे त्याने आर्मीला प्राधान्य दिले. त्याने देशसेेवेची निवड केल्यामुळे त्याच्या आईवडिलांना आनंद झाला असून त्यांची मान अभिमानाने उंचावली आहे.

विशालच्या या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लवकरच विशाल भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट या पदावर नियुक्त होणार आहे. विशालचे देहारादून येथे 18 महिन्यांचे प्रशिक्षण होणार आहे त्यांनतर तो देश सेवेत रुजू होणार आहे.

प्रतिकूल परिस्थितीही हार न मानता चांगले परिश्रम घेऊन यश संपादन केल्यामुळे विशालचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे. तसेच पुढील वाटचलीसाठी विशालला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page