नाशिकच्या तरुणाने मिळवले घवघवीत यश! प्रतिकूल परिस्थितीवर मात करून RBI मध्ये झाली निवड..

परिस्थिती कशीही असली तरी आपल्यात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर, कोणतेही संकट आपल्याला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. नाशिक येथील मालेगावमधील अयोध्यानगर येथे राहणारे भाग्येश जाधव यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे फॉरेन करन्सी विभागात निवड करण्यात आली आहे.

भाग्येश जाधव यांची घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. परंतु, त्यांच्या आईवडीलांनी मोलमजुरी करून भाग्येश यांच्या उच्च शिक्षणासाठी नेहमी प्रयत्न केले. भाग्येश यांची आई ज्योती यांनी रात्रंदिवस शिलाई काम केले आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला.

आपली आई आपल्यासाठी करत असलेल्या कष्टांची जाणीव ठेवत भाग्येश यांनी मेहनतीने अभ्यास केला. भाग्येश यांनी मसगा महाविद्यालयातून स्टॅटिस्टिक्समधे बी.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर पुणे येथील मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर येथे स्टॅटीस्टीक्समधे एम.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले.

यादरम्यान त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. फोटोग्राफी व शूटिंग इत्यादी माध्यमातून भाग्येश यांना स्वतः च्या शिक्षणासाठी आर्थिक मदत झाली.

भाग्येश नेहमी विविध बॅंकिंग व स्पर्धा परीक्षांची तयारी करत असत. यादरम्यान त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परीक्षेस बसण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे त्यांनी रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश प्राप्त केले. भाग्येश यांनी आरबीआय परीक्षेत ग्रेड डी अधिकारी म्हणून यश मिळवले आहे.

देशभरातून लाखो विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यातून केवळ दोनशे चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भाग्येश यांनी पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात त्यांची महत्त्वाच्या फॉरेन करन्सी विभागात निवड झाली आहे.

भाग्येश यांच्या या घवघवीत यशामुळे त्यांच्या कुटुंबियांना खूप आनंद झाला असून त्यांना भाग्येश यांचा फार अभिमान वाटत आहे. परिसरातील लोकांनी त्यांच्या या यशाचे अभिनंदन केले आहे. तसेच सो’श’ल मी’डि’या’च्या माध्यमातून देखील त्यांचे अभिनंदन आणि भरभरून कौतुक केले जात आहे आणि पुढील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा ही देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page