रेशीमशेती करून तरुणाने वर्षात कमावले 23 लाख रुपये, ‘रेशीमरत्न’ पुरस्कार देऊन करण्यात आला गौरव

आजकाल शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून यशस्वी शेती करत आहेत. तसेच अनेक तरुण मंडळी देखील शेतीकडे वळत आहेत आणि नवनवीन प्रयोग करत आहेत. आज आपण जालन्यातील अशाच एका यशस्वी तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. जालना जिल्ह्यातील भाऊसाहेब निवदे हे भारतीय लष्करात जाण्यासाठी तयारी करत होते.

रोज सकाळी व्यायाम करायला जायचे तेव्हा त्यांना गावातील ज्ञानदेव बिडवे यांची रेशीम शेती दिसायची. ते रोज त्यांची शेती पाहायचे आणि उत्सुकतेने रेशीम शेतीबाबत चौकशी करायचे. त्यांना जसजशी माहिती समजत गेली तसतसे त्यांना रेशीम शेतीमध्ये चांगला नफा आहे असे समजले आणि त्यांनी त्या दिशेने वाटचाल सुरू केली.

भाऊसाहेबांनी रेशीम शेतीबाबत जालना जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेवून शेती कामास प्रारंभ केला. भाऊसाहेब यांनी एका एकरमध्ये 6000 तुतीची लागवड केली. तुतीमधून चांगले उत्पादन मिळू लागल्याने त्यांनी 4 एकर मध्ये तुतीची लागवड केली असून त्यांना 2 एकर मधून प्रत्येक महिन्याला 4/5 क्विंटल रेशीम कोष निघतात आणि यामधून प्रतिक्विंटला 50 हजार रुपये दर भेटत असून दरमहा 2 लाख उत्पादन मिळते, असे भाऊसाहेबांनी सांगितले.

भाऊसाहेबांनी मार्च 2021 ते सप्टेंबर 2022 या वर्षभराच्या कालावधीत तब्बल 23 लाख रुपयांचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे त्यांना नागपूर येथे ‘रेशीमरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

पारंपरिक शेतीला बाजूला सारत भाऊसाहेबांनी रेशीम कोष उत्पादनात उत्तम यश संपादन केले आहे. त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. परंतु त्यांच्यामध्ये असलेली जिद्द, चिकाटी, मेहनत तसेच रेशीम अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि आई वडील व भाऊ यांची देखील मेहनत होती. यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे असे त्यांनी सांगितले आहे.

भाऊसाहेब निवदे हे मराठवाड्यातील रेशीम शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेणारे प्रथम युवा शेतकरी ठरले आहेत. रेशीम लागवड, उत्पादन तसेच बाजारपेठेतील तंत्रज्ञानचे अनुभव घेत जास्तीतजास्त युवा शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळवण्याचे त्यांचे धेय आहे. भाऊसाहेबांनी केलेल्या या विक्रमी कार्यामुळे सध्या ते अधिक चर्चेचा विषय ठरले आहेत. तरुण वयात त्यांनी घवघवीत यश मिळवले आहे म्हणून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page