ठाण्याच्या अवघ्या 8 वर्षांच्या मुलीने माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक यशस्विरित्या सर करून अनोखा विक्रम केला..

मनात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर कोणत्याही वयात यश हे मिळतेच. हेच सिद्ध करून दाखवले आहे ठाण्याच्या या मुलीने. ठाणे येथील घोडबंदर भागातील आठ वर्षीय गृहिता विचारे ही तिचे आई-वडिल, तिची मोठी बहीण हरिता आणि आजी यांच्यासह राहते. गृहिताचे वडिल सचिव विचारे यांना आधीपासूनच गिर्यारोहणाची आवड होती. त्यामुळे गृहिता आणि तिची 14 वर्षीय बहीण हरिता यांना लहान वयातच गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली होती.

सचिव हे अनेक मोठ्या गिर्यारोहण गटासोबत विविध किल्ले तसेच शिखर सर करण्यासाठी जात असतात. त्यामुळे वडिलांकडून योग्य ते प्रशिक्षण घेत, नियमित व्यायाम आणि सुरक्षेची साधने यांचा समतोल साधत गृहिता आणि हरिता यांनी आतापर्यंत राज्यातील जवळपास 40 गड-किल्ल्यांवर गिर्यारोहण केले आहे.

नुकतेच काही महिन्यांपूर्वी गृहिताने नऊवार साडी नेसून नवरा-नवरी हा अवघड असणारा डोंगर सर केला होता. यासाठी तिला इंडिया बूक ॲाफ रेकाॅर्डने सन्मानित देखील केले होते. पुढे गृहिताने एवढ्या लहान वयात जगातील सर्वात उंच असलेले आणि तितकेच कठिण असलेले माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक सर करण्याचा निर्णय घेतला.

यासाठी तिच्या वडीलांची तिला चांगली साथ लाभली. तिने महिनाभर आधीच तयारीला सुरुवात केली होती. वडीलांकडून शनिवार-रविवार या सुट्टीच्या दिवशी डोंगर चढणे तसेच रोज जिन्यावरून चढ उतार करणे असे व्यायाम सुरू केले होते.

पूर्ण तयारीनिशी गृहिताने ऑक्टोबर महिन्यात माउंट एव्हरेस्ट गिर्यारोहणास सुरूवात केली होती. जगातील सर्वात उंच मानले जाणारे हे शिखर गाठणे काही खायचे काम नाही. अनेक मोठ्यामोठ्यांना हा शिखर सर करताना घाम फुटला आहे.

हा शिखर सर करणे म्हणजे आव्हानात्मकच होते. वाढती थंडी, बदलत असणारे तापमान, प्राणवायूची कमी होणारी पातळी यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जात गृहिताने हे उंच शिखर गाठायचे अशी जिद्द बाळगून आपला प्रवास सुरू केला.

अखेर 28 ऑक्टोबरला जगातील सर्वांत उंच आणि कठीण असणारे माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक गृहिताने सर केले आहे. हे यश संपादन करणारी गृहिता ही राज्यातील पहिली सर्वात लहान मुलगी आहे, तर तिने देशात दुसरा बहुमान पटकावला आहे.

इतक्या लहान वयात एवढी उंची गाठून तिने हे यश प्राप्त केले आहे. तिच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक केले जात आहे. तिच्या या यशाने गृहिताच्या आईवडिलांची मान अभिमानाने उंचावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page