एका मजुर बापाची मुलगी बनली GST इन्स्पेक्टर, 2 वेळा अपयश आले तरीही मानली नाही हार..

प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. यात काहीजण लवकर हार मानतात तर काहीजण कठोर संघर्ष करून यशाचे शिखर गाठतात. असाच काहीसा प्रकार नाशिक येथून समोर आला आहे ज्यात तरुणीने आपल्या परिस्थितीसमोर हार न मानता जिद्दीच्या बळावर GST इन्स्पेक्टर झाली आहे.

आज आपण पाहत आहोत की, मुली प्रत्येक क्षेत्रात आपले कौशल्य दाखवून पुढे जात आहेत. मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. सर्वच क्षेत्रात मुली आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिकच्या तरुणीने घवघवीत यश मिळवून अनेक तरुणींसमोर चांगला आदर्श ठेवला आहे.

महाराष्ट्रातील नाशिक येथे राहणारी कोमलची नुकतीच वस्तू आणि सेवा कर निरीक्षक म्हणून नियुक्त झाली आहे. इथपर्यंतचा तिचा प्रवास हा अजिबात सोपा नव्हता परंतू, तिने हार मानली नाही. तिने जिद्दीने मेहनत केली. यासाठी कोमलने महागडे कोचिंग लावले नाहीत किंवा लाखो रुपये देखील खर्च केले नाहीत.

कोमलचे वडील ऋषीपाल हे व्यवसायाने रोजंदारी मजूर आहेत. यामुळे त्यांची घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अशा कठीण परिस्थितीमध्ये कोमलने हार मानली नाही आणि तिने नागरी सेवा परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. या काळात तिच्याकडे कोचिंग क्लासला जाण्यासाठी पैसे देखील नव्हते. मात्र, ती आपल्या मतावर ठाम रहली आणि कठोर परिश्रम करून कोमल GST इन्स्पेक्टर झाली.

लहानपणापासूनच कोमल अभ्यासात हुशार होती त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला अभ्यासापासून रोखले नाही. त्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन कोमलला बी. कॉम आणि एम.कॉमचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्टया चांगली साथ दिली, जेणेकरून कोमल उच्च शिक्षण घेऊन उत्तम करिअर करू शकेल.

यादरम्यान कोमलने परिक्षेची तयारी सुरू ठेवली होती. त्यावेळेस तीने कोणत्याही कोचिंगची मदत घेतली नाही. तिने मेहनत घेऊन 2015 मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) ची परीक्षा दिली. मात्र, तिला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले नाही परंतु, तिने हार न मानता पुन्हा 2016 मध्ये परीक्षा दिली. मात्र, अवघ्या 4 गुणांमुळे कोमलला अपयश आले.

दुसऱ्यांदा अपयश आल्यानंतरही कोमलने हार मानली नाही. तिला सरकारी नोकरी करायची जिद्द होती, म्हणून तिने पुन्हा 2018 मध्ये एसएससी सीजीएलची परीक्षा दिली. यावेळेस अखेर कोमल परिक्षेत उत्तीर्ण झाली आणि त्याचबरबरीने तिने मुलाखतीचा टप्पाही यशस्वीपणे पार केला.

त्यांनतर कोमलला 2021 मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आता कोमल नाशिकमध्ये जीएसटी निरीक्षक म्हणून कार्यरत आहे. तिच्या या यशाचे तिच्या कुटुंबियांना खूप कौतुक आहे तसेच त्यांना कोमलचा फार अभिमान वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page