वडील गेल्यांनतर त्यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, संघर्षातून बनले IAS अधिकारी

आपल्यात जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. आज आपण अशाच एका आयएएस अधिकारी बद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांनी अनेक संकटे मागे टाकत यशाचे शिखर गाठले. महाराष्ट्रातील बोईसर येथे राहणारे वरुण कुमार बरनवाल यांच्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे एक छोटेसे दुकान होते.

मुलांच्या शिक्षणाबरोबर घराचा खर्च भागेल एवढीच कमाई या दुकानातून होत असे. पण दहावीची परीक्षा संपल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच वरुण यांच्या वडिलांचे आकस्मित नि’ध’न झाले. त्यानंतर कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली.

यामुळे त्यांनी दहावीची परिक्षा झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान पुन्हा सुरू केले. ते बराच वेळ दुकानात काम करायचे. मात्र, त्यांचे मन सतत अभ्यासाकडे धावायचे.

काही दिवसांनी त्यांचा दहावीचा निकाल आला. त्यात त्यांनी संपूर्ण शहरात दुसरा क्रमांक पटकावला. त्यांना या गोष्टीचा खूप आनंद झाला होता. तसेच त्यांच्या कुटुंबाला देखील त्यांचा खूप अभिमान वाटत होता. वरुण यांना पुढे शिकण्याची खूप इच्छा होती. मात्र, पैशाच्या कमतरतेमुळे त्यांना पुढील शिक्षण घेता येत नव्हते.

अशा परिस्थितीमध्ये वरुण यांची अभ्यासाप्रती आवड पाहून त्यांच्या वडिलांचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी एका कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळवून दिला. या गोष्टीचा वरुण यांना खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे खूप आभार मानले आणि त्यांनी पुन्हा एकदा अभ्यासाला सुरुवात केली आणि कधीच मागे वळून पाहिले नाही. ते कॉलेज सोबतच सायकल दुरुस्तीचे काम देखील करायचे.

यानंतर वरुण यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण घायचे होते. यासाठी त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु, तेथे ही त्यांना पैशाच्या कमतरतेमुळे कॉलेजची फी भरण्यात देखील खूप त्रास झाला. या दरम्यान एकदा शिक्षक आणि मित्रांनी मिळून त्यांची फी भरली. तसेच त्यांना पुस्तकेही घेऊन दिली.

पुढे वरुण दिवसा कॉलेजला जायचे आणि संध्याकाळी कॉलेजवरून आल्यानंतर सायकलच्या दुरुस्तीचे काम करायचे. तसेच ते मुलांची शिकवणी देखील घ्यायचे. यामुळे त्यांना कॉलेजची फी आणि घराची जबाबदारी नीट सांभाळता येऊ लागली.

ही कामे करत असताना त्यांनी याचा परिणाम कधीही आपल्या अभ्यासावर होऊ दिला नाही. त्यांनी मेहनतीने अभ्यास करून इंजिनीअरिंगच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये टॉप केला. त्यामुळे त्यांना महाविद्यालयाकडून शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होण्यास मदत झाली.

पुढे वरुण यांचे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी कसून परिक्षेचा अभ्यास करण्याची तयारी सुरू केली.

अखेर वरुण हे 2013 मध्ये पहिल्याच प्रयत्नांत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी यूपीएससी परीक्षेत देशात 32 वा क्रमांक पटकावला आणि कुटुंबाचे नाव रोशन केले. वरुण सांगतात की त्यांनी यूपीएससी कोचिंगसाठी एक पैसाही दिला नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून शिक्षकांनीच त्यांची फी माफ केली.

अशा प्रकारे सायकल दुरुस्तीचे दुकान चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत वरुण आयएएस अधिकारी बनले. वरुण कुमार बर्नवाल हे गुजरातमध्ये आयएएस अधिकारी म्हणून तैनात आहेत. त्यांचा एकंदरीतच हा सगळा संघर्ष अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page