वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरी करायचे, मेहनत घेऊन मुलगा झाला इस्रोमध्ये वैज्ञानिक!

प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते की आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करून आयुष्यात पुढे जाऊन स्वत:चे आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे. अशी अनेक मुलं आहेत जी अत्यंत वाईट परिस्थितीतून आलेली असतात तरीही त्यांनी स्वत: चे आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केलेले आहे.

अशीच काहीशी गोष्ट आहे सोमनाथ माळी यांची.. ज्यांचे वडील एक शेतमजूर होते. परंतु, त्यांच्या मुलाने कठोर परिश्रम करून इस्त्रो येथे वैज्ञानिक होण्यासाठीचा प्रवास पूर्ण करून दाखवला आहे.

सोमनाथ माळी हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावचे रहिवासी आहेत. सोमनाथ हे एका मागासवर्गीय समाजातील आहेत. त्यांचे पालक आणि भाऊ दुसर्‍याच्या शेतात रोजगार करून सोमनाथ यांना शिकवत होते.

सोमनाथ यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांनतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बीटेकचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्यांनी दिल्ली आयआयटीमधून मेकॅनिकल डिझायनींगचे शिक्षण घेतले. यादरम्यान सोमनाथ यांनी 2016 मध्ये इस्रोला अर्ज केला होता. त्यांनतर त्यांनी भरपूर मेहनत घेतली परंतु, त्यांना इस्रोची लेखी परीक्षा पास करण्यात अपयश आले.

सोमनाथ यांना एमटेक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इन्फोसेसमध्ये नोकरी मिळाली. तेथे त्यांना विमान इंजिन डिझाईनवर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सोमनाथ यांनी एमटेक पदवीच्या आधारे नोव्हेंबर 2019 मध्ये दुसऱ्यांदा इस्रोला अर्ज केला.

त्यांनतर अखेर सोमनाथ यांची 2 जून 2021 रोजी केरळच्या तिरुअनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून निवड करण्यात आली. इस्रो मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेले सोमनाथ माळी हे महाराष्ट्रातील पहिले विद्यार्थी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबाला त्यांचा फार अभिमान आहे.

त्यांच्या यशाबद्दल गावकऱ्यांना देखील त्यांचा खूप अभिमान वाटतो. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही एका शेतमजुराच्या मुलाने आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जाते. ते अनेकांसाठी एक प्रेरणास्थान आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page