कलिंगड शेती करून या युवा शेतकऱ्याने मिळवला लाखोंचा नफा! अनेक शेतकऱ्यांनी प्रेरणा घेत केली तब्बल 100 एकरांहून अधिक लागवड..

आजकाल अनेक तरुण शेती क्षेत्राकडे वळून नवनवीन प्रयोग करत आहेत. सध्या शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीमध्ये वातावरणामुळे वारंवार नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी आता सेंद्रीय शेती करणे पसंद करत आहेत आणि त्या दृष्टीने पाऊल टाकत भरघोस उत्पन्न देखील मिळवत आहेत. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या शेतीमध्ये नवीन प्रयोग करून कलिंगड पिकाची यशस्वी शेती केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड येथील अक्षय लेंभे या युवा शेतकऱ्याने शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा विचार केला. या तरुण शेतकऱ्याने पारंपारिक पिकांतून बाहेर पडून कलिंगड शेती करण्याचा निर्णय घेतला. अक्षय यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत अक्षय यांना लाखो रुपयांचा नफा प्राप्त झाला आहे.

अक्षय लेंभे हे गेल्या तीन वर्षांपासून कलिंगड शेती करत असून त्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या दरम्यान त्यांनी तीन वेळा कलिंगड पीक घेतलेले आहे. जेव्हा पहिल्या वेळेस त्यांनी कलिंगड पिकाची लागवड केली तेव्हा त्यांना सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यांनतर दुसऱ्यावेळेस त्यांना दोन लाखांचे उत्पन्न मिळाले होते.

अक्षय सांगतात की, “कलिंगड हे तीन महिन्याचे पीक असून या पिकाला एका एकर मागे सुमारे 50-60 हजार रुपये खर्च होतो. त्यांनतर अवघ्या तीन महिन्यांतच कलिंगड बाजारात विक्रीसाठी पाठवण्यास तयार होते. या पिकाला बाजारभाव देखील चांगला मिळतो. शेतकरी हे पीक वर्षातून चार वेळा देखील घेऊ शकतात. जर शेतकरी एका एकर मधून पीक घेत असेल तर शेतकऱ्याला तीन महिन्यात अडीच ते चार लाख रुपये पर्यंत नफा मिळतो. अक्षय यांनी आतापर्यंत कलिंगड पिकातून तब्बल 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे, असे ही ते सांगतात.

कलिंगड पिकाची यशस्वी शेती करून अक्षय लेंभे हे अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणा बनले आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेऊन आता अनेक शेतकरी कलिंगड शेती करण्याकडे वळले आहेत. पारंपारिक शेतीला पर्याय म्हणून पाचोड परिसरातील शेतकऱ्यांनी सुमारे 100 एकरांहून जास्त क्षेत्रात कलिंगड पिकाची लागवड केली आहे.

या शेतीमध्ये प्रगती साधत शेतकऱ्यांना उत्तम यश देखील मिळत आहे. या भागातील शेतकरी प्रामुख्याने ऑगस्टा या जातीच्या कलिंगडची लागवड करतात. आता कृषी विभागाचे मार्गदर्शन घेऊन अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करत आहेत. यामुळे शेतकरी स्वतः मल्चिंग पेपरवर प्लास्टिक ट्रे मध्ये रोपे तयार करून त्यांची लागवड करतात. ज्यामुळे खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होते आणि भरघोस उत्पन्न मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page