आता ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम’ म्हणायचं, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वपूर्ण निर्णय

स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयानुसार, सरकारी कार्यालयात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ असं बोलायचं आहे. या निर्णयानंतर आता संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर झाल्यानंतर वनखात्याबरोबर सांस्कृतिक कार्य हे खातं सुधीर मुनगंटीवार यांना सोपविण्यात आले आहे.

त्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “आपल्याला संपूर्ण वर्षभर देशभक्ती संपणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आजपर्यंत आपण इंग्रजांनी दिलेला ‘हॅलो’ या शब्द बोलताना वापरत आलो, परंतु आपला देश स्वातंत्र्य होण्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम म्हणत भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले.

आता इंग्रजांनी देश सोडून इतकी वर्षे झाली आहेत तरी देखील त्यांची छाप अजून कमी झालेली नाही. यासाठी मी एक सांस्कृतिक विभागाचा मंत्री म्हणून नवीन संकल्प करत आहे. आता यापुढे सरकारी कार्यालयात ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ म्हटले जाईल. याचबरोबर आपण देखील मोबाइलवर बोलताना ही गोष्ट अमलात आणली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page