मोटार दुरुस्तीचे काम करून वडिलांनी मुलाला उच्चशिक्षित बनवले, मुलगा न्यायिक सेवेच्या परीक्षेत राज्यात 5 आला

आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याजवळ जिद्द आणि चिकाटी असेल तर मेहनतीच्या जोरावर आपण यशाचे शिखर नक्कीच गाठू शकतो. हे एका गावातील मुलाने सिद्ध केले आहे. त्यांनी कष्ट करून आपल्या आई-वडिलांसह गावाचे नाव देखील उज्ज्वल केले आहे.

मूळचे पाली येथील तखतगढ येथील रहिवासी असून अनेक वर्षांपासून जालोर जिल्ह्यातील भीनमाळजवळील दसपन येथे राहणारे बाबूलाल सुथार यांनी मोटार दुरुस्तीचे काम करून आपला मुलगा रवींद्र कुमार यांना उत्तम शिक्षण दिले.

पुढे रवींद्र कुमार यांनी बीकॉम आणि एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर रवींद्र यांनी 2018 मध्ये गुजरात उच्च न्यायालयात वकिलीचे काम सुरू केले. यादरम्यान वकिलीसोबतच गुजरात न्यायिक सेवेची त्यांनी तयारी सुरू केली.

यावर्षी झालेल्या परीक्षेत रवींद्र यांनी पहिल्याच प्रयत्नात 21 ऑक्टोबर रोजी आलेल्या निकालात गुजरात राज्यातून पाचवा क्रमांक मिळवला. रविंद्र यांना प्रेरित करण्यामागे आणि त्यांना पाठिंबा देण्यात त्यांच्या पालकांचा खूप मोठा वाटा आहे, असे ते सांगतात.

रवींद्र लहानपणापासूनच वाचनात हुशार होते, असे त्यांचे वडील सांगतात. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्यांचा मुलगा न्यायाधीश व्हावा आणि जेव्हा गुजरात न्यायिक सेवेचा निकाल लागला तेव्हा रवींद्र यांचा गुजरात राज्यात 5 व्या क्रमांक आला. हे पाहून त्यांच्या कुटुंबात आनंदाला पारावार उरला नव्हता. तसेच त्यांच्या गावात आणि समाजात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

बाबूलाल सुथार यांना तीन मुले आणि एक मुलगी आहे. मोठा मुलगा नरेंद्र सुथार हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. विक्रम सुथार हे गृह मंत्रालयात कार्यरत आहेत आणि आता रवींद्र यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. तसेच त्यांची मुलगी तारा एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे.

जालोर जिल्ह्यातील सुथार समाजातील रवींद्र सुथार हे पहिले न्यायाधीश आहेत. न्यायाधीश बनून त्यांनी आपल्या समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. नव्या पिढीला प्रेरणा देत ते म्हणतात, नेहमी मोठी स्वप्ने पहा, जितकी मोठी स्वप्ने पाहाल, तितकीच मेहनत करावी लागेल.

रविंद्र यांच्या या यशाने अनेक तरुणांना नवी प्रेरणा मिळेल. आपल्यात जिद्द असेल तर कितीही सकंटे आली तरी आपल्याला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हे रविंद्र यांच्या उदाहरणातून सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page