शेतीत राबणाऱ्या शेतकरी कुटुंबातील या तरूणाने जिद्दीने स्पर्धा परीक्षेमध्ये यशाला घातली गवसणी..

परिस्थिती कशीही असली तरी आपल्याजवळ स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असेल तर आपण आपले ध्येय नक्कीच साध्य करतो. मात्र, अपयश कितीही आले तरी खचून न जाता सातत्याने परिश्रम केल्यास नक्कीच यशाचे शिखर गाठता येते, हे सिध्द करून दाखवले आहे नाशिकच्या या तरुणाने.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील नाळे या छोट्या लोकवस्ती असलेल्या खेड्यातील प्रशांत जाधव हा येथेच लहानाचा मोठा झाला. त्याने आपले प्राथमिक शिक्षण याच खेड्यात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेत घेतले. त्यांनतर माध्यमिक शिक्षण दोन-अडीच किलोमीटर रोज चालत जाऊन चिखलओहोळ येथे पूर्ण केले.

प्रशांत जाधव याचे आईवडील शेतकरी.. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असत. यामुळे घराची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये प्रशांतने आपले पुढील शिक्षण बहिणीच्या गावी जाऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. धुळे येथे राहणाऱ्या बहिणीच्या गावी राहून त्याने आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

पुढील शिक्षणासाठी प्रशांत आत्याकडे जाऊन राहू लागला. बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशांतने जयहिंद संस्थेत कला शाखेची पदवी शिक्षण घेण्याचे ठरवले. पदवी शिक्षण घेत असताना त्याने स्पर्धा परिक्षा देण्याचे ध्येय ठेवले.

आत्याची चारही मुले उच्चशिक्षित असून उत्तम नोकरी करत आहेत. आपल्या चारही भावंडांकडून प्रेरणा घेत प्रशांतने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. यादरम्यान पदवी शिक्षण घेत असताना त्याने उत्तम गुण प्राप्त करत अनेक पारितोषिके देखील मिळवले.

स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच पदवी शिक्षण घेत असताना तो आपल्या कुटुंबाला शेतीकामामध्ये देखील मदत करायचा. एवढेच नव्हे तर एकेकाळी मजूर उपलब्ध नसल्याने कांदा लागवड करणे, पेरणी इत्यादी कामे देखील त्याने केली. त्याने कमवा आणि शिका याचा अवलंब करत. डीटीपी डिझाईनींग, टायपिंग कोर्सेस देखील पूर्ण केले. याचा त्याला आपल्या अभ्यासासाठी भरपूर फायदा झाला.

प्रशांतने 2017 मध्ये पीएसआय व सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदासाठी मुख्य परीक्षा दिली होती. मात्र, अवघ्या सहा गुणांनी त्याला अपयश आले. यानंतरही त्याने मेहनतीने पीएसआय फिजीकल साठी प्रयत्न केले. प्रशांत शारीरिक चाचणीमध्ये यशस्वी झाला. तसेच मुलाखतीमध्ये ही त्याला यश मिळाले मात्र, मुख्य निवड मध्ये त्याला यश मिळाले नाही.

अपयश आल्यानंतर ही खचून न जाता जिद्दीने प्रशांतने पुन्हा परिक्षा दिली आणि यशस्वी होत अखेर मंत्रालयात क्लर्क पदासाठी त्याची निवड झाली. अजूनही मोठा पल्ला त्याला गाठायचा आहे. प्रशांतने पीएसआय व्हायचे स्वप्न उराशी बाळगून त्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्याने अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीत, असे तो सांगतो.

शेतीमध्ये राबणाऱ्या शेतकरी कुटुंबातील प्रशांतने जिद्दीने शिक्षण पूर्ण करत स्पर्धा परिक्षेत यशाला गवसणी घातली आहे. त्याच्यातील अनेक गुणांनी कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या कुटुंबाला त्याचा फार अभिमान वाटत आहे असे त्याचे कुटुंबीय सांगतात. सध्या सर्वच स्तरातून प्रशांतचे भरभरून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page