मुंबईत आले तेव्हा खिशात केवळ 200 रुपये जवळ होते, आज मेहनत करून तब्बल 30 करोडांची स्वतःची कंपनी उभी केली..

प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी वाईट परिस्थितीतून जावे लागत असते. अशा परस्थितीमध्ये काही जण लगेच हार मानतात तर काही जण या परिस्थतीशी दोन हात करून त्यावर मात करत वाईट परिस्थितीला मागे टाकत चांगली परिस्थिती निर्माण करत असतात. याच गोष्टीचा प्रत्यय देणारी गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत. ज्यात प्रेम गणपती हे जेव्हा चेन्नईहुन मुंबईला आले होते, तेव्हा फक्त त्यांच्याकडे 200 रुपये होते. परंतु, त्यांनी हार न मानता जिद्द व कठोर परिश्रम करून यशाचे शिखर गाठले आहे.

तामिळनाडू राज्यातील नागालपूरम येथील रहिवासी असलेले प्रेम गणपती यांचे 10 वी पर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावातच पूर्ण झाले. प्रेम हे अभ्यासात फार हुशार नव्हते. त्यांना अभ्यासात जास्त रस नव्हता त्यामुळे त्यांनी आपले गाव सोडून चेन्नईला जाण्याचा निर्णय घेतला.

चेन्नईला आल्यानंतर प्रेम गणपती यांनी सुरवातीला चेन्नईमध्ये अनेक लहान-मोठ्या नोकऱ्या केल्या. परंतु, त्यांना नेहमीच काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. या गोष्टीचा विचार करून त्यांनी चेन्नईला निरोप दिला आणि काहीतरी नवीन करण्याची इच्छा असलेले प्रेम यांनी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट स्वप्नांची नगरी असणाऱ्या मुंबईमध्ये प्रवेश केला.

प्रेम गणपती मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांच्याजवळ केवळ 200 रुपये होते. मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपण कसा टिकाव धरायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यातच ते जेव्हा वांद्रे स्थानकात पोहचले तेव्हा त्यांच्या सामानाची बॅग चो’री’ला गेली. सुरुवातच अशा प्रकारे झाली होती तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली अशा न सोडता तसेच कोणताही वाईट विचार न करता पुढे जाण्याचे ठरवले.

मुंबईमध्ये आलो म्हणजे उदरिर्वाहासाठी काम हे करावेच लागणार त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही असे मनाशी पक्के करत त्यांनी नोकरी शोधण्यास सुरूवात केली. त्यावेळेस प्रेम गणपती यांना मुंबई मध्ये असणाऱ्या माहीम बेकरी मध्ये डिश धुण्याची नोकरी मिळाली यातून त्यांना प्रतिमहिना 150 रुपये मिळत असत.

प्रेम गणपती यांनी ही नोकरी करून थोडे थोडे पैसे साठवण्यास सुरुवात केली. त्यांनतर त्यांनी रेल्वे स्टेशनजवळ डोसा बनवण्याचे नवीन काम करण्यास सुरुवात केली. अनेकांना त्यांनी बनवलेला डोसा आवडू लागला त्यामुळे त्या भागात ते प्रसिद्ध व्ह्यायला लागले होते आणि यामुळे त्यांना चांगला नफा देखील होत होता.

त्यानंतर हळूहळू व्यवसाय वाढवत त्यातील नवनवीन धोरणे शिकत त्यांनी एक दुकान भाड्याने घेतले आणि त्या दुकानात त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. येथे काम करत असताना त्यांनी त्यांच्यासोबत काम करण्यासाठी काही माणसे देखील ठेवली होती. यादरम्यान प्रेम गणपती हे वेगवेगळ्या प्रकारचे डोसा बनवायला शिकले. त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या आणखी वाढली.

त्यांना तब्बल 26 प्रकारचे डोसे बनवता येतात. यानंतर त्यांना व्यवसायात मिळणारे यश पाहता त्यांनी सेंटर वन मॉलमध्ये डोसा प्लाझा या नावाने नवीन दुकान चालू केले. हळूहळू यात देखील पसंती वाढू लागली आणि यातून चांगला नफा देखील होऊ लागला म्हणून त्यांनी याची नवीन फ्रँचायझी सुरु केली. असे करत करत त्यांचे आता 11 राज्यात 45 रेस्टॉरंट आहेत. अशा प्रकारे त्यांनी कठोर परिश्रम करत व्यवसायाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page