मित्र असावे तर असे! सांगलीमध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कोणालाही न सांगता वर्गमित्राला केली अशी मदत..

सांगली जिल्ह्यातील नागाव कवठे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलांनी वर्गमित्राला आजारपणात केलेल्या मदतीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगलेली दिसत आहे. नागाव कवठे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याच्या अंगावर पुरळ उठले होते.

परंतु, त्यावर औषधोपचार करणे त्याला परवडणारे नव्हते कारण, त्याच्या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती खूप बेताची आहे. अशा परिस्थिती मध्ये त्याला मदत करण्यासाठी त्याचा वर्गातील 8 ते 10 मित्रांनी त्याला मदत करण्याच्या निश्चय करून त्याला औषध आणून देण्याचे ठरवले.

यासाठी त्यांनी विचार करून प्रत्येकाने आपल्या घरातून खाऊ खाण्यासाठी पैसे मागून आणायचे आणि त्या पैशातून मित्राला औषध आणून द्यायचे ठरवले. त्यांनतर जमा झालेल्या पैशातून त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन औषध आणले आणि त्या मित्राला दिले. औषधामुळे हळूहळू त्याला आता फरक जाणवू लागला आहे.

मात्र, ही गोष्ट त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरी देखील सांगितली नव्हती. तसेच त्यांच्या शिक्षकांना सुद्धा या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. 15 दिवसांनी ही माहिती एका मुलाकडून शिक्षकांना समजली. ही माहिती समजल्यानंतर या मित्रांच्या मैत्रीची अनोखी गोष्ट समोर आली आहे.

यानंतर शिक्षकांनी त्यांचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला आहे. तसेच नागाव कवठे येथील रहिवासी असलेले डॉ. संदीप पाटील यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना 101 रुपयांचे बक्षीस दिले आहे तसेच त्या गरजू विद्यार्थ्याला 1001 रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे.

संबंधित मित्रांची नावे अर्णव साळुंखे, शिवरत्न पाटील, साहील पाटील, तेजस कांबळे, ओम वाघमोडे, राजवर्धन सुर्यवंशी, सनी शिरतोडे, वरद पाटील, आयान मुल्लाणी, हर्षवर्धन कांबळे, पार्श्व रुईकर, हर्षवर्धन सुर्यवंशी, रुद्रप्रताप सुर्यवंशी, सोहम सुतार आहेत.

थोडी मदत करून त्याचा प्रचार करणारे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळत असतात. मात्र या चिमुकल्यांनी दातृत्वाला एका नव्या उंचीवर नेऊन समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. सध्या या गोष्टीची सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. सर्वच स्तरातून या मित्रांच्या मित्रत्वाचे भरभरून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page