अवघ्या 22 व्या वर्षी अनेक संघर्ष करून UPSC परिक्षा उत्तीर्ण करून बनले IPS अधिकारी.. आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे केले चीज..

आपल्यात जर यश मिळवायची जिद्द असेल तर कितीही अडचणी आल्या तरीही आपण मागे हटत नाही आणि कोणीही आपल्याला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाही. आज आपण अशाच एका आयपीएस अधिकारी बद्दल जाणून घेणार आहोत. सफीन हसन हे मूळचे गुजरातचे आहेत. त्यांचे प्रारंभिक शिक्षण गुजरातमधील बनासकांठा येथील कानोदर या छोट्या गावात पूर्ण झाले.

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी सुरतला गेले. त्यांनी एनआयटी मध्ये प्रवेश घेतला. आयपीएस बनण्याची कल्पना त्यांच्या मनात आली जेव्हा ते त्यांच्या मावशीसोबत एका शाळेत गेले होते, तेव्हा तिथे आलेल्या कलेक्टरचे आदरातिथ्य पाहून त्यांनी मावशीला प्रश्न विचारला की हे कोण आहेत आणि सगळे त्यांचा इतका आदर का करत आहेत?

तेव्हा त्यांनी उत्तर दिले की हे आयपीएस आहेत जे जिल्ह्याचे प्रमुख असतात. हे पद आपल्या देशसेवेसाठी असते. त्यांचे हे बोलणे ऐकून सफीन यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2017 साली अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात 570 रँकसह युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचे आयपीएसचे प्रशिक्षण सुरू झाले. ते गुजरात केडरमधून आयपीएस प्रशिक्षणासाठी हैदराबादला गेले होते.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना गुजरातमधील जामनगर जिल्ह्यातून पोलीस उपअधीक्षक पद मिळाले. परंतु अधिकारी होण्याचा त्यांचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. अधिकारी होण्यासाठी सफिन यांना खूप कष्ट करावे लागले. त्यांचे आई-वडील दोघेही हिरे कारागीर होते.

अभ्यासासाठी पैसे कमी पडू लागले तेव्हा त्यांच्या आईने रेस्टॉरंट्स आणि लग्नसमारंभांमध्ये देखील काम केले. हिरे कारागीराची नोकरी गेल्यानंतर त्यांचा घरखर्च भागत नव्हता. तेव्हा त्यांच्या आईने रोट्या लाटून तसेच वडीलांनी इलेक्ट्रिशनचे काम करून हसन यांचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कित्येक रात्री त्यांनी उपाशी राहून काढल्या. असे ते सांगतात. त्यांच्या हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page