एकेकाळी बुटांच्या दुकानात काम केले, स्वतःचा व्यवसाय सुरू करून उभे केले 150 कोटींचे साम्राज्य..

अनेकजण आपल्या जिद्दीच्या जोरावर आज यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतात. यश मिळवण्यासाठी त्यांनी प्रचंड खस्ता खाल्लेल्या असतात. यश सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी आपल्याला खूप जीव ओतून मेहनत करावी लागते. मात्र, जेव्हा यश मिळते तेव्हा ते आपल्यासोबत भरपूर आनंद घेऊन येत असते. आपल्या आयुष्याला ते एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.

आज आपण अशाच एका व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत. पुण्यामधील खडकी गावात अरुण खरात यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आरोग्य अधीक्षक म्हणून कार्यरत होते. अरुण यांना लहानपणापासूनच वेगळे काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. मोठे होऊन त्यांना स्वतःचा असा एक व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न होते. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या रॉयल एनफिल्ड गाडीवरून संपूर्ण जग फिरण्याचेही स्वप्न पाहिले होते.

पुढे त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मामांच्या बुटांच्या दुकानात काम केले. त्यांनतर त्यांनी सरकारी महाविद्यालयातून तीन वर्षांचे मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. मात्र, त्यांना नोकरी करण्यात रस वाटत नव्हता कारण त्यांना आधीपासूनच स्वतःचा व्यवसाय असावा असे त्यांचे स्वप्न होते.

त्यासाठी त्यांनी एसटीडी बूथ उघडले, जिथे ते ऑनलाइन ट्रेनची ही तिकिटे बुक करत होते. एसटीडी बूथ मध्ये काम करत असताना त्यांनी थोडे पैसे जमा केले आणि या पैशांच्या सहाय्याने ‘विंग्ज ट्रॅव्हल्स’ नावाचा नवा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अरुण यांनी अनेक बँकांकडून कर्ज घेतले होते.

अरुण यांनी हा व्यवसाय एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. त्यासाठी त्यांनी भरपुर मेहनत आणि कष्ट केलेले आहेत. त्यांचा हा व्यवसाय भारतातच नाही तर म्यानमार, थायलंड इत्यादी परदेशात सुद्धा पोहचला आहे.

600 हून अधिक कर्मचारी आज त्यांच्या व्यवसायाशी संबंधित आहेत. पुढे अरुण यांनी कार भाड्याने देण्याची सेवा देखील सुरू केली आहे. त्यांनी मालक-चालक या नावाची एक योजना सुरू केली ज्या अंतर्गत ड्रायव्हर स्वतःची 20 ते 30 टक्के रक्कम वाहन खरेदी करण्यासाठी गुंतवतो.

विंग्स ट्रॅव्हल्सला त्याच्या गॅरंटीतून बँकेकडून उरलेले पैसे मिळतात आणि नंतर तीन वर्षांनी ती कार चालकाची होते. तसेच अरुण यांनी विंग्स सखी नावाची कॅब सेवा देखील सुरू केली आहे त्यात महिला चालक आहेत.

आज अरुण यांची कंपनी परदेशामध्ये म्हणजेच म्यानमार, थायलंड आणि व्हिएतनाम सारखे मोठ्या देशांमध्ये ही आहे,  जिथे त्यांनी रेडिओ टॅक्सीची सेवा सुरू केली आहे. या व्यवसायद्वारे आता त्यांची वार्षिक उलाढाल 150 कोटींहून अधिक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page