धुळ्याच्या शेतकऱ्याची यशस्वी शेती! बाजरी पिकाच्या बियाणांची या देशातून केली आयात, आज सर्वत्र होत आहे कौतुक..

अनेक शेतकरी आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीत प्रगती करत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण देणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावचे शेतकरी निसार शेख यांची चिकसे शिवारात शेती आहे. निसार शेख यांनी आपल्या शेतात बाजरीचे पीक घेतले आहे आणि यावर्षी पहिल्यांदाच त्यांनी बाजरी पिकाचे बियाणे चक्क तुर्कस्तान या देशातून आयात केले आहे.

या पिकासाठी त्यांना प्रतिकीलो हजार रुपये असा खर्च आला आहे. परदेशातील या पिकाचे निसार यांनी यशस्वी उत्पादन घेतले आहे. आपल्या बाजरी पिकापेक्षा हे पीक थोडे वेगळे असते असे ते म्हणतात.

या पिकाची उंची 12 फूट असते. तसेच पिकाला लागलेल्या कणसाची लांबी सुमारे 4 फूट असते. शिवाय ह्या बाजरीच्या भाकरी चविष्ट तसेच आरोग्यासाठी चांगल्या असतात, असे निसार शेख यांनी सांगितले.

तुर्कस्तानी बाजरी पेरणीसाठी निसार शेख यांना प्रति एकरला सव्वा किलो बियाणे लागले. आपल्या बाजरी पिकाप्रमाणेच या बाजरीच्या पिकासाठी मशागत व खते द्यावी लागतात. यापूर्वी अशा पेरणीचा अनुभव कोणीही घेतला नव्हता. त्यामुळे पिकाची काळजी घेताना निसार यांच्याकडून काही चुका झाल्या. मात्र, त्यानंतर त्यांना उत्तम उत्पादन मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

साक्री तालुक्यातील पंचक्रोशीत हा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे. यामुळे परिसरातील अनेक शेतकरी या ठिकाणी भेट देत आहेत. निसार यांनी यशस्वी शेती करून अनेक शेतऱ्यांसाठी चांगला आदर्श ठेवला आहे. यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक देखील केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page