पुण्यातील वडील-मुलाच्या जोडीने शेतीमध्ये केलाय हा अनोखा प्रयोग, जाणून तुम्ही देखील कौतुक कराल..

आजकाल अनेक लोक विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू करत आहेत. नवीन तंत्रज्ञान वापरून विकास साधत आहेत. आपल्या नवनवीन कल्पना अमलात आणून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत. आज आपण अशाच एका अनोख्या शेतीची गोष्ट पाहणार आहोत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत मधील रहिवासी असलेले राजेंद्र ननावरे व त्यांचा मुलगा कुलदीप ननावरे यांनी शेतामध्ये चक्क खेकड्याची शेती सुरू केली.

अलीकडच्या काळात खेकड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. परिणामी खेकड्यांचा पुरवठा कमी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा विचार करून या वडील-मुलाने खेकड्याच्या शेतीचा अभ्यास करून हा अनोखा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

या दोघांनी शेतीला जोड धंदा म्हणून खेकड्याच्या शेतीचा प्रयोग केला. यामध्ये त्यांनी शेतात 40 फूट रुंद व 50 फूट लांब तसेच 11 फूट खोल असा एक हौद तयार केला. यात वाळूचे खडे, मोठे डबर, माती, बारीक वाळू यांनी भर घातली. यामध्ये पाण्याची योग्य प्रमाणात व्यवस्था करण्यात आली. यानंतर यात हळुहळू तब्बल एक टन खेकडे या पाण्यात सोडण्यात आले.

हे खेकडे त्यांनी भिगवण, भोर, खडकवासला अशा विविध ठिकाणांहून आणण्यात आले आहेत. जवळजवळ या खेकड्यांची संख्या पाच ते सहा हजार इतकी असेल, असे ते सांगतात. या खेकड्यांना खाण्यासाठी बाजारातील टाकाऊ भाजीपाला, तसेच हॉटेल मधील टाकाऊ अन्न आणि कोंबड्यांचे अवशेष इत्यादी दिले जाते.

दौंड तालुका आधी गुळाच्या गुऱ्हाळासाठी प्रसिध्द होता. या ननावरे वडील-मुलाच्या जोडीने येथे उत्तर भारतीय गुऱ्हाळाचा पहिला प्रयोग केला होता. त्यामुळे हा तालुका गुऱ्हाळाच्या नावाने ओळखला जाऊ लागला.

आता देखील पुन्हा एकदा या दोघांनी खेकडा शेतीचा नवा प्रयोग सुरू करून लोकांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या खेकड्यांच्या शेतीचा प्रयोग आजच्या अनेक तरुणांना फायदेशीर ठरत आहे. हा प्रयोग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येथे येऊन भेट देत आहेत.

हे दोघे देखील त्यांना योग्य ते मार्गदर्शन देखील करत आहेत. शेती बरोबरच खेकड्यांची शेती हा उत्तम पर्याय असल्याचे ते सर्वांना सांगतात. तसेच तरुणांनी या शेतीकडे वळावे त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल आणि यातून चांगला नफा देखील तुम्हाला प्राप्त होईल, असे ते सांगतात. खेकडा शेतीच्या या भन्नाट प्रयोगाची सध्या तुफान चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page