पालघरच्या या कन्येने रचला इतिहास, वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी झाली गावची सरपंच! शेतकऱ्यांना करणार मदत..

आपल्या मनात जर जिद्द असेल तर आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो. त्यासाठी विशिष्ट वयाची गरज नसते, हे सिद्ध करून दाखवले आहे पालघरच्या या कन्येने. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील ऊसर या गावची रहिवासी असलेली 22 वर्षीय पूजा यशवंत चव्हाण हिने इतक्या कमी वयात गावचा कारभार हाती घेतला आहे. ती आता उसर गावची सरपंच बनली आहे. बहुदा इतक्या कमी वयात गावाचा कारभार सांभाळणारी ही महाराष्ट्रतील प्रथम तरुणी असेल, असे सांगितले जात आहे.

पूजाने कृषी क्षेत्रात डिप्लोमाचे शिक्षण घेतले आहे आणि सध्या ती बी.एच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. पुजाचे मामा राजेश मुकणे हे पालघर येथील कुडूस जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनीच पुजाला सरपंच बनण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे आणि यावेळेस गावाच्या निवडणूकीला उभे राहण्याची प्रेरणा दिली. यात पूजाला गावकऱ्यांनी देखील चांगली साथ दिली.

16 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला. विरोधी पक्षाचा अनेक मतांनी पराभव करून पूजा निवडणूक जिंकली आणि आता तिची उसर गावच्या सरपंचपदी निवड झाली आहे.

पूजाचे वडील शेतकरी आहेत. तसेच ते रिक्षा सुद्धा चालवतात. पूजाने कृषी क्षेत्रात डिप्लोमा केला आहे. यामुळे तिला गावकऱ्यांना शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान शिकवून गावचा विकास करायचा आहे असे ती सांगते. तिला अजून शिक्षण घेण्याची इच्छाही आहे. जेणेकरून ती गावचा विकास उत्तमरीत्या करू शकेल.

गावकऱ्यांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून केवळ आर्थिक अडचणींमुळे त्यांनी शेती करणे सोडून दिले आहे. त्यामुळे जे आपल्या आर्थिक स्थितीमुळे शेती करू शकत नाहीत अशा लोकांसाठी ती सरकारकडून आर्थिक मदतीबाबत प्रयत्न करणार आहे. यामुळे शेतकरी आपला शेती व्यवसाय पुन्हा सुरू करून त्यांच्या अर्थिक अडचणींवर मात करू शकतील, असे पुजा सांगते.

एवढ्या लहान वयात सरपंचपदाची निवडणूक झाल्यामुळे पुजाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिला आपल्या गावचा विकास करायचा आहे. गावातील प्रत्येक समस्येवर तिला उपाय काढायचे आहेत. गावच्या समस्या सोडवून गावचा सर्वांगीण विकास केला जाईल असा पूजाचा ठाम विश्वास आहे. अवघ्या 22व्या वर्षी पूजाने एवढे मोठे यश संपादन केले आहे म्हणून सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे. सगळीकडे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page