IAS होण्यासाठी मुलाला 2 वर्षे स्वतःपासून लांब ठेवले, दुसऱ्या प्रयत्नात AIR 2 मिळवून अधिकारी झाली..

अनेकदा लोकांचा असा समज असतो की, लग्नानंतर मुलीचे आयुष्य थांबते. लग्नानंतर मुलगी संसारात मग्न होते आणि यामुळे तिला तिच्या स्वप्नांशी तडजोड करावी लागते. पण लोकांची ही समज या आईने चुकीची सिद्ध करून दाखवली आहे. हरियाणातील सोनिपत येथील रहिवासी असलेल्या अनु कुमारी यांनी भौतिकशास्त्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच या पुढील शिक्षण त्यांनी नागपूर येथून पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनु कुमारी यांनी एका खासगी कंपनीत दोन वर्षे नोकरी देखील केली. अनु कुमारी म्हणाल्या की, “माझी नोकरी सुरळीत चालू होती परंतु मला त्यातून मानसिक समाधान नव्हते. माझ्यासाठी हे सर्व एका मशीन सारखे झाले होते आणि त्यामुळेच मला ते सहन होत नव्हते.”

पुढे लग्न झाल्यानंतर त्यांनी गुडगावला बदली घेतली. पण या यांत्रिकी जीवनाला कंटाळून त्यांनी नोकरी सोडली आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. अनेक लोकांनी त्यांना यासाठी विरोध केला पण IAS अधिकारी होणे हे त्यांचे स्वप्न होते.

त्यांनी अधिकारी होणे इतके मनावर घेतले की त्यांनी अभ्यासासाठी स्वतःच्या मुलाला स्वतःपासून दोन वर्षे दूर ठेवले. त्यांना त्यांच्या मुलाची सारखी आठवण येत असे पण परीक्षा उत्तीर्ण करूनच त्यांना त्यांच्या मुलांना भेटायचे होते.

जेव्हा त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या 1 गुणांनी अपयशी ठरल्या. यामुळे त्या खचून गेल्या पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा जोमाने मेहनत घेतली आणि दुसऱ्या प्रयत्नात ऑल इंडिया रँक 2 मिळवून त्यांनी सरकारी अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page