रंगकाम करणाऱ्या बापाची लेक झाली UPSC परिक्षा उत्तीर्ण, IAS तुकाराम मुंढे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत केली होती तयारी..

प्रत्येकाला आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी खडतर प्रवास करावा लागतो. या प्रवासात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु आपल्याजवळ या संकटावर मात करण्याची जिद्द असेल तर आपण साहजिकच यश प्राप्त करू शकतो. याचाच प्रत्यय देणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत.

अमरावती जिल्ह्यातील बिछू टेकडी या झोपडपट्टीमधील रहिवासी असलेल्या पल्लवी देविदास चिंचखेडे यांची आर्थिक परिस्थीती फारशी चांगली नव्हती. त्यांचे वडील रंगकाम करतात आणि आई शिवणकाम करते. अशा प्रकारे दोघे ही कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत.

पल्लवी ह्या लहापणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्या जेव्हा शाळेत शिकत होत्या तेव्हा आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे आणि राज्यातील इतर सहा जण युपीएससी परिक्षेत उत्तीर्ण झाले होते. यामुळेच आपणही अधिकारी व्हायचे असे पल्लवी यांनी मनाशी पक्के केले होते.

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सत्काराला पल्लवी यांचे वडील त्यांना घेऊन गेले होते. तेव्हा आपल्या मुलीने ही मोठे होऊन अधिकारी बनावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. आपल्या मुलीला चांगले शिक्षण मिळावे यासाठी देविदास नेहमी झटत राहिले. गरिबी असली तरी कठोर प्रयत्न करून यश मिळतेच यावर देविदास यांचा विश्वास होता.

पुढे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा आदर्श तसेच वडीलांनी वेळोवेळी दिलेली प्रेरणा डोळ्यांसमोर ठेवत पल्लवी यांनी युपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. यादरम्यान आणखी तयारी करण्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागणार होते आणि यासाठी त्यांना जवळपास दोन लाख खर्च येत होता.

मात्र, घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांनी आधी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळाली. यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत झाली. त्यांनी तीन वर्षे नोकरी करून पैसे साठवले आणि यातूनच त्यांनी दिल्लीला जाऊन यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

अखेर पल्लवी यांनी 2021 साली युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश मिळवले. पल्लवी यांना समाजातील महिलांसाठी तसेच मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी काम करायचे आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

पल्लवी यांनी आपल्या कष्टांची पराकाष्ठा करत हे यश संपादन केले आहे असे त्यांचे वडील म्हणतात. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबियांना त्यांचा खूप अभिमान आहे. आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी आपल्या जिद्दीच्या जोरावरच यश हे मिळतेच, याचे पल्लवी ह्या एक उत्तम उदाहरण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page