“प्रेमासाठी कायपण!..” कोल्हापूरच्या तरुणाने हायवेवर होर्डिंग लावून प्रेयसीला घातली लग्नाची मागणी

“प्रेम केले आहे तर घाबरायचे कशाला?” आणि ही गोष्ट कोल्हापूरच्या पठ्ठ्याने खरी करून दाखवली आहे. कोल्हापूर म्हटले की आपल्याला तांबडा-पांढरा, कुस्ती असे आठवते परंतु सध्या कोल्हापूरात प्रेमाचा पूर आला आहे. होय.. कोल्हापूरच्या तरुणाने चक्क हायवेवर भले मोठे होर्डिंग लावून प्रेयसीला प्र’पोज केले आहे.

“तुझं जर माझ्यावर प्रेम आहे तर माझ्यासाठी काय करशील?” असे प्रश्न विचारण्याऱ्या अनेक मुली तुम्ही पहिल्या असतील आणि या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपले तरुण नको ते प्रयत्न करत असतात. पण कोल्हापूरच्या सौरभ कसबेकरने त्याची प्रेयसी उत्कर्षाला हायवेवर होर्डिंग लावून लग्नाची मागणी घातली आहे.

या होर्डिंगची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्यावर अनेक लोकांनी कमेंट देखील केल्या आहेत. अनेकजणांनी तरुणाच्या या धाडसाचे कौतुक केले आहे. सर्वात मोठी आश्चर्याची बाब म्हणजे सौरभची प्रेयसी उत्कर्षाने लग्नाला होकार दिला आहे. त्या दोघांच्या घरच्यांनी देखील लग्नाला मान्यता दिली आहे.

कोल्हापूरचा सौरभ आणि सांगलीची उत्कर्षा हे सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. सुरवातीला त्यांच्यात एवढी जवळीक नव्हती परंतु जेव्हा सौरभच्या लग्नाबाबत घरात चर्चा झाली तेव्हा त्याने त्याला उत्कर्षा आवडते असे सांगितले.

यानंतर त्याच्या पालकांनी मुलीच्या घरी जाऊन याबाबत बोलणी देखील केली. परंतु त्यांच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आला नाही. हे पाहता सौरभने उत्कर्षाला अनोख्या पध्दतीने लग्नाची मागणी घालायची असे ठरवले आणि त्याने कोल्हापूर- सांगली रोडवर एका भल्या मोठ्या होर्डिंगवर लग्नाची मागणी घातली.

या दोघांनी एकत्र येऊन या होर्डिंग खाली फोटो सुद्धा काढला. या लग्नाला उत्कर्षा आणि तिच्या घरच्यांनी परवानगी दिली आहे. या दोघांचा लग्न सोहळा 27 मे रोजी पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page